यवतमाळ : भाजपचे यवतमाळ-पुसद समन्वयक तथा माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या महामंडळावर नियुक्तीचे आमीष दाखूवन तब्बल २० कोटी रूपयांची फसवणूक करण्याचा डाव अवधूतवाडी पोलिसांनी माजी आमदारांच्या कार्यालयातच उधळला. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी ही घटना शनिवारी घडली असून, नितीन सुरेशचंद्र भुतडा यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री तीन भामट्यांना रंगेहात अटक केली. लौकीक जगन्नाथ फुलकर, गणेश लालसिंग राठोड आणि विश्वजित सुरेश राठोड (सर्व रा. यवतमाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
२० कोटी ५० लाखांचा ‘मास्टरप्लॅन’
तक्रारीनुसार, १६ मे २०२६ रोजी आरोपी लौकीक फुलकर याने भुतडा यांच्या व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. त्यानंतर २० मे रोजी त्याने केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या ४२ महामंडळांची एक बनावट यादी पाठवली, ज्यावर ‘कँडेट्स रिक्वायर्ड फॉर बीजेपी’असे लिहिले होते. या नियुक्तीसाठी सर्व काम करून देणारा मुख्य इसम म्हणून गणेश राठोडचा संपर्क देण्यात आला होता. यानंतर गणेश राठोडने भुतडा यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्यासाठी थेट २० कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. व्यवहार पक्का करण्यासाठी एकूण रक्कमेच्या ५ टक्के ‘टोकण रक्कम’ देण्याची अट घालण्यात आली आणि सोमवारपर्यंत टोकण पोहचल्यास दिल्लीहून थेट कॉल येईल, अशी भुलथाप मारली.
अमित शाह यांच्या कथित नातेवाईकाचा ‘फेक’ कॉल!
या संपूर्ण व्यवहारात विश्वास निर्माण करण्यासाठी गणेश राठोड याने एका महिलेशी भुतडा यांचे फोनवर बोलणे करून दिले. तिचे नाव हेमलता अग्रवाल असून ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नातेवाईक आहे आणि मध्यभारतातील एका हिंदी वृत्तपत्र समूहाची मॅनेजिंग डायरेक्टर आहे, असा खोटा परिचय देण्यात आला. त्या महिलेनेही आर्थिक व्यवहार पूर्ण करा, तुम्हाला केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळेल, टेन्शन घेऊ नका, असे सांगून भुतडा यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला.
महाठग अडकले भूतडांच्या जाळ्यात!
नितीन भुतडा यांना यापूर्वीच्या फसवणुकीच्या प्रकारांवरून आरोपींवर तीव्र संशय आला. त्यांनी आरोपींना धडा शिकवण्यासाठी स्वतः एक प्लॅन आखला. त्यांनी बाजारातून एक गुप्त कॅमेरा घड्याळ खरेदी केले आणि या भामट्यांसोबत बैठक आयोजित केलेल्या माजी आमदार मदन येरावार यांच्या कार्यालयात संपूर्ण भाग दिसेल असे लावून दिले. ३० मे रोजी सकाळी ११:३० वाजता आरोपी गणेश आणि विश्वजित राठोड कार्यालयात पोहोचले. व्यवहारासाठी भुतडा यांनी एक तपकिरी लेदरची बॅग तयार केली होती, ज्यात ५० लाख रुपये असल्याचा भास व्हावा म्हणून खाली कागदाचे रिम, नोटबुक आणि वरच्या बाजूला ५०० रुपयांच्या नोटांचे ५० हजार रुपये ठेवले होते. दोन्ही आरोपींसोबत पदाबाबत चर्चा पूर्ण झाल्यावर आरोपींनी चहापाणी घेतले आणि टोकण रकमेची मागणी केली. जशी विश्वजित राठोडने ती ५० हजारांची बॅग ताब्यात घेतली, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अवधूतवाडी पोलिसांनी त्यांना पकडले आणि बॅग जप्त केली.
दिल्ली कनेक्शन आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटची चौकशी
या गुन्ह्यात केंद्रीय गृहमंत्रालय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावांची बनावट पत्रके आणि याद्या वापरण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आता या टोळीच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेत असून, याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत जोडलेले आहेत का, याचा कसून तपास करत आहेत. अटक केलेल्या तिन्ही आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या थरारक कारवाईमुळे यवतमाळच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
