यवतमाळ – महागाव येथील ‘सदाशिव इंगळे अपंग, मतिमंद निवासी शाळेत’ महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीने शुक्रवारी अचानक ‘सरप्राईज व्हिजिट’ देत झाडाझडती घेतली. पटसंख्येवर ५० पोरांची नावं, पण शाळेत शोधूनही एक पोरगा सापडेना! १३ खाटांवर ५० पोरांची झोपायची ‘सर्कस’ आणि जेवणाचा पत्ताच नाही. हा अजब कारभार पाहून संतप्त झालेल्या आमदारांच्या समितीने, ‘अशी बोगस शाळा चालवताच कशाला? आधी कुलुप ठोका याला!’ असा सज्जड दम देत थेट शाळा बंद करण्याचेच फर्मान सोडले आहे. समितीच्या या निर्णयाने कागदोपत्री शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांना चांगलाच झटका बसला.
हार – तुऱ्या ऐवजी कारवाई
विधिमंडळ अंदाज समिती येईल, हार तुरे घेईल आणि निघून जाईल असा सर्वांचा ‘अंदाज’ होता मात्र हा अंदाज चुकला. आमदार सदाभाऊ खोत, आमदार मंदा म्हात्रे, आमदार मनीषा चौधरी आणि आमदार सतीश चव्हाण या नेत्यांचा समावेश असलेली समिती दुपारी दीड वाजता महागावात दाखल झाली. सुरुवातीला तहसील कार्यालयात आढावा बैठक आटोपल्यावर समितीने आपला मोर्चा या निवासी शाळेकडे वळवला. अचानक आलेला गाड्यांचा पाहून संस्थेतील शिक्षकांच्या पायाखालची वाळूच सरकली.
१३ खाटेवर ५० विद्यार्थी कसे झोपत असतील?
कागदपत्रे पटसंख्येवर ५० विद्यार्थी आहेत. पण वर्गात, हॉस्टेलमध्ये अन् पटांगणात एकही पोरगा हजर नव्हता. निवासी शाळेत १३ खाटा अन् ५० विद्यार्थी असा चिड आणणारा प्रकार समितीच्या निदर्शनास आला. ५० दिव्यांग आणि मतिमंद पोरांना झोपवण्यासाठी शाळेत अवघे १३ बेड आहेत. उरलेली ३७ पोरं काय हवेत लटकून झोपायची की एकावर एक रचून? असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
डोळ्यांवर पट्टी बांधून तपासणी करता का?
हा प्रकार बघून समितीने स्थानिक गटविकास अधिकारी आणि समाजकल्याण विभागाच्या जिल्हा अधीक्षक मंगला मून या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘डोळ्यांवर पट्टी बांधून तपासणी करता का?’ अशा शब्दांत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांच्या या ‘झाडाझडती’ने शिक्षण व समाजकल्याण क्षेत्रातील भ्रष्ट साखळीचे धिंडवडे निघाले असून संस्था चालक प्रचंड हादरून गेले आहेत.
भाजपाच्या माजी आमदाराची शाळा
विशेष म्हणजे, सदाशिव इंगळे अपंग व मतिमंद निवासी शाळा भाजपचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची आहे. त्यामुळेच की काय, आजवर या शाळेतील गैरकारभाराकडे अधिकारी डोळेझाक करत होते का, असा प्रश्न आता सामान्य जनता विचारत आहे.
