यवतमाळ: महाराष्ट्रभर आज धुलीवंदनाचा उत्साह रंगांच्या उधळण करून साजरा होत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी या गावात मात्र एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी परंपरा जोपासली जात आहे. येथे रंग किंवा गुलाल उधळला जात नाही, तर चक्क एकमेकांवर ‘गोटमार’ करून रक्ताचे शिंपण करत धुलीवंदन साजरे केले जाते. श्रद्धेचा हा अनोखा आणि काहीसा वेदनादायी खेळ पाहण्यासाठी आज सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. धुळवड साजरी करण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे इथल्या ‘गोटमार’ प्रथेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
या यात्रेची सुरुवात अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने होते. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळीच गावाजवळील नदीकाठी ग्रामस्थ एकत्र येतात आणि ‘हुतूतु’ हा पारंपरिक खेळ खेळला जातो. या खेळाचा नियम असा की, जो खेळाडू सर्वात शेवटी बाद होतो, त्याची चक्क ‘जिवंत अंत्ययात्रा’ काढली जाते. या व्यक्तीला एका तिरडीवर झोपवून, जणू काही मृतदेह असल्यासारखे बँड-बाजाच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवले जाते. स्थानिक भाषेत याला ‘मढं’ असे संबोधले जाते. ही मिरवणूक संपली की खऱ्या अर्थाने ‘गोटमार’ प्रथेला सुरुवात होते.
गोटमार सुरू होताच गावातील पुरुष दोन गटांत विभागले जातात. एका गटातील लोक उंच मचाणावर चढतात, तर दुसरा गट जमिनीवरून त्यांच्यावर तुफान दगडफेक करतो. या दगडफेकीत सहभागी होणाऱ्या भक्तांना ‘होळकर’ म्हटले जाते. जोपर्यंत एखादा भाविक गंभीर जखमी होऊन त्याच्या शरीरातून रक्ताची धार वाहत नाही, तो पर्यंत ही गोटमार थांबत नाही. एकदा का रक्ताचा अभिषेक झाला, की त्या व्यक्तीला तातडीने गदाजी महाराजांच्या मंदिरात नेले जाते. तिथे जखमेवर औषधोपचार करण्याऐवजी आदल्या दिवशीच्या होळीची राख गदाजी महाराजांची ‘विभूती’ म्हणून लावली जाते. या विभूतीमुळे कोणत्याही संसर्गाशिवाय जखम त्वरित भरून येते, अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. आजच्या आधुनिक युगात ही प्रथा अघोरी वाटू शकते, मात्र बोरी गदाजीच्या लोकांसाठी हा त्यांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा भाग आहे.
या यात्रेत दरवर्षी अनेक लोक जखमी होतात, मात्र आजवर कोणाचाही जीव गेला नसल्याचा दावा ग्रामस्थ करतात. ही यात्रा विदर्भातील लोकसंस्कृतीचे अनोखे आणि विस्मयकारक उदाहरण आहे.
काय आहे या परंपरेमागची आख्यायिका?
अनेक शतकांपूर्वी संत गदाजी महाराज घोड्यावर बसून या गावात आले होते. त्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी महाराजांच्या हातून अनावधानाने झालेल्या दगडफेकीत एका बालकाचा मृत्यू झाला. संतप्त गावकऱ्यांनी महाराजांना दोरखंडाने बांधून ठेवले. तेव्हा महाराजांनी सांगितले, या मुलाच्या अंगाला होळीची राख लावा, तो जिवंत होईल! महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून राख लावताच तो मुलगा जिवंत झाला, अशी लोककथा सांगितली जाते. याच घटनेची स्मृती आणि महाराजांप्रती असलेली अढळ श्रद्धा म्हणून त्यावेळेपासून ही ‘गोटमार’ प्रथा सुरू झाली, ती आजही धुलीवंदनाच्या दिवशी उत्साहात सुरू आहे.
