यवतमाळ : शिकाऊ व कायम वाहन परवाना देण्याकरिता अधिकृत शासकीय चलानाच्या व्यतिरिक्त दोनशे रुपये प्रमाणे दहा क्लासेसकडून दोन हजार रुपये लाचेची मागणी करणारे तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. तसेच एका खासगी दलालास लाच स्वीकारताना अटक केली. ही कारवाई आज शुक्रवारी पुसद येथे आरटीओ कॅम्प दरम्यान करण्यात आली.
सुरज गोपाल बाहीते (३२), मयुर सुधाकर मेहकरे (३०), बिभिषण शिवाजी जाधव (३०) अशी लाचखोर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नावे आहेत. यवतमाळ येथील उपप्रादेशिक परीवहन कार्यालय ते कार्यरत आहे. तर बलदेव नारायण राठोड (२९) रा. गव्हा, ता. मानोरा, जि. वाशिम असे लाच स्विकारणाऱ्या खासगी दलालाचे नाव आहे.
सरकार मान्य ड्रायव्हींग स्कुलच्या एका महिला संचालिकेने ७ मे रोजी आरटीओ कॅम्प दरम्यान आरटीओ अधिकारी लाचेची मागणी करतात, अशी लेखी तक्रार यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. या तक्रारीवरुन शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुसद येथे आरटीओ कॅम्प दरम्यान सापळा रचला. तसेच पंचासमक्ष पडताळणी केली असता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बाहीते, मेहकरे आणि जाधव यांनी तक्रारदार यांना त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांना शिकावू व कायम पक्का परवाना देण्याकरीता खासगी दलालाच्या माध्यमातुन अधिकृत शासकीय चलना व्यतिरिक्त प्रत्येक अर्जामागे २०० रुपये अतिरिक्त लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.
दरम्यान, शुक्रवारी सापळा कारवाईत एकुण १० शिकवणी क्लासेस करीता २०० रुपये प्रमाणे दोन हजारांची लाच खाजगी एजंट बलदेव राठोड यांच्यामार्फत तक्रारदाराकडून स्विकारली. याप्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. ही कार्यवाही अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे, यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस निरीक्षक मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार अतुल मते, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचीन भोयर, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम, सरिता राठोड व चालक अतुल नागमोते यांनी केली.
या कारवाईने प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार उघडपणे चव्हाट्यावर आला असून, राज्याचे परिवहन मंत्री या संदर्भात काही पावले उचलतील काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.