यवतमाळ : कोणतेही मोठे यश मिळवण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर त्याला जिद्द आणि अफाट मेहनतीची जोड असावी लागते. हेच यवतमाळच्या आठवडी बाजार परिसरात राहणाऱ्या पृथ्वी नितीन कामळे हिने सिद्ध करून दाखवले आहे.
अत्यंत बिकट आणि कौटुंबिक संकटांच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पृथ्वीने सनदी लेखापाल (सीए) ही अत्यंत कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिच्या या यशाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
खडतर प्रवास
पृथ्वीचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. सीए परीक्षेचा अभ्यास सुरू असतानाच तिच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले. आईच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच वडिलांना अर्धांगवायूचा तीव्र धक्का बसला आणि ते अंथरुणाला खिळले. घराचा आधार तुटलेला असताना आणि वडील आजाराशी झुंज देत असताना पृथ्वी डगमगली नाही. तिने या संकटांनाच आपली ताकद बनवले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.
अभ्यासात सातत्य
आपल्या यशाबद्दल बोलताना पृथ्वीने सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून तिने अभ्यासात कमालीचे सातत्य ठेवले होते. यासाठी तिने विशेष ‘टार्गेट चार्ट’ आणि स्वतंत्र वेळापत्रक तयार केले होते. दररोज तब्बल १६ तास अभ्यास करून तिने हे यश मिळविले. सनदी लेखापाल होण्यासाठी आवश्यक असलेल्या फाउंडेशन, इंटर आणि अंतिम परीक्षा या तिन्ही टप्प्यांवर चिकाटीने अभ्यास केल्यामुळेच आज हे यश संपादन करता आले.
पुढे काय करणार
भविष्यात नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करण्याचा तिचा मानस आहे. स्वप्नांना उभारी द्यायची असेल तर परिस्थिती कशीही असली तरी चालते, केवळ अभ्यासातील सातत्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर ध्येय गाठता येते, असा मोलाचा संदेश तिने दिला आहे.
पहिल्याच प्रयत्नांत ‘यशस्वी’
दरम्यान यवतमाळ येथीलच मेस चालविणाऱ्या कुटुंबातील यशस्वी संजय आरगुलवार या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नांत सनदी लेखापाल या अत्यंत कठीण परीक्षेत यश मिळविले. यशस्वीचे आई-वडील दोघेही घरगुती मेस चालवितात. मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लेक पहिल्याच प्रयत्नात झाली ‘सीए’ झाल्याचा आनंद तिच्या पालकांनी व्यक्त केला. यशस्वीने दोन्ही ग्रुपमध्ये मिळून एकूण ३१८ गुण मिळविले. एका जागतिक कंपनीत तिने सीए आर्टिकलशिप पूर्ण केली आहे. घरात आर्थिक चणचण असतानाही केवळ जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यशस्वीने हे यश मिळविल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनतीची जोड असेल तर यश मिळविता येते, असे यशस्वीने सांगितले.
