यवतमाळ: शहरातील कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागत असून, त्यावर उपाय म्हणून प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी रस्त्यावर उतरवून कचरा संकलन केले.
भाजपची सत्ता आल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्षांनी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची घोषणा हवेत विरल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. नगर पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये ई-रिक्षा चालक आणि सफाई कर्मचारी कामावर गैरहजर असल्याने कचऱ्याचे ढीग साचले होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते तथा नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतः ई-रिक्षा चालवत प्रभागातील कचरा संकलित केला, ज्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची नाचक्की झाली आहे.

यवतमाळ नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली. सत्ताधाऱ्यांनी ‘स्वच्छ व सुंदर यवतमाळ’चे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शहर स्वच्छ होण्याऐवजी अस्वच्छतेच्या विळख्यात अडकत असल्याचे विदारक चित्र आहे. कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांवर नगरपालिकेच्या प्रशासनाचा कोणताही प्रभावी अंकुश उरलेला नाही, असा आरोप होत आहे.

कचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक घराघरातून दररोज कचरा उचलणे बंधनकारक आहे. मात्र, यवतमाळमध्ये परिस्थिती उलट आहे. कामगारांची अनुपस्थिती ही मोठी समस्या झाली आहे. कचरा संकलनासाठी नियुक्त कर्मचारी आणि चालक वारंवार कामावर दांडी मारतात, त्यामुळे काम प्रभावित झाले आहे. कामगारांना गणवेश, ओळखपत्र आणि सुरक्षा साधने पुरवली जात नाहीत. ओला व सुका कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी केवळ कागदावरच मर्यादित आहे. ई-रिक्षांचे वेळापत्रक ठरलेले नसल्यामुळे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते, असा आरोप नगरसेवक वाघमारे यांनी केला.

स्वतः कचरा उचलून डॉ. वाघमारे यांनी प्रशासनाला आरसा दाखवला. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकू नये. ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. ठेकेदार नियमांचे पालन करत नसेल, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.