यवतमाळ : एकीकडे पाहुणचाराचा थाट आणि दुसरीकडे संशयाचे काळेकुट्ट जाळे… या विसंगतीत एका निष्पाप गृहिणीचा बळी गेला आहे. केवळ ‘मटण नीट शिजले नाही’ या शुल्लक कारणावरून झालेल्या वादाने आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. मित्रासमोर पतीने केलेला अपमान सहन न होऊन पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. चेतना मनोज जाधव (३३) असे मृत महिलेचे नाव आहे.

‘त्या’ रात्री काय घडले?

बुधवारची रात्र चेतना जाधव हिच्यासाठी शेवटची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. ‘मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर,’ अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता, पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला.

साता जन्माच्या सोबतीचा करुण अंत

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते; डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

मुलं पोरकी झाली…

चेतना आणि मनोज यांच्या यांच्या संसारवेलीवर मुलगा लेख आणि मुलगी अन्वी अशी दोन मुले आहेत. मात्र वडिलांच्या तापट स्वभावाने दोन्ही मुले आईच्या प्रेमास पोरकी झाली आहे. ज्या बापाने घराचे रक्षण करायचे, त्याच बापाच्या संतापाने या मुलांच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरवला आहे.

पतीस अटक

चेतनाचे मामा मनोहर राठोड, रा. देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगूरकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.