यवतमाळ : महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आणि फोटोंचा गैरवापर करून बनावट (फेक) इन्स्टाग्राम अकाउंट तयार करणाऱ्या, तसेच तिचे आणि तिच्या मित्र-मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करून अश्लील शब्दांसह सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला यवतमाळ शहर पोलिसांनी थेट गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून बेड्या ठोकल्या आहेत. फरहान अली सुभान अली (२४, रा. शहापूर, पो. स्टे. धानपूरा, जि. रामपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने १९ जुलै २०२६ रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपीने तीन वेगवेगळ्या बनावट इन्स्टाग्राम आयडीवरून तक्रारदार विद्यार्थिनीसह तिच्या मित्र-मैत्रिणींचे फोटो मॉर्फ केले होते. हे अश्लील फोटो आणि त्याला जोडलेले बदनामीकारक मजकूर इन्स्टाग्रामसारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अपलोड करून त्यांची महाविद्यालयात आणि समाजात मोठी बदनामी केली होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, ७९, ३५६(२) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
अहमदाबादमधून बेड्या
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरहान अलीने पोलीस कारवाईच्या भीतीने स्वतःचा मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी बंद केला आणि मूळ राहते राज्य (उत्तर प्रदेश) सोडून तो पसार झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मेटा (इन्स्टाग्राम) कडून तांत्रिक माहिती मागवून घेतली. प्राप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले.
यवतमाळ शहर पोलिसांचे एक विशेष पथक तात्काळ अहमदाबादकडे रवाना करण्यात आले. तेथील रखीलयाल परिसरात सापळा रचून आरोपी फरहान अली याला २५ ऑगस्ट रोजी सायबर पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीला यवतमाळ येथे आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून, मुदत संपल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सायबर सुरक्षेचे पोलिसांचे आवाहन
ही संपूर्ण कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार मिश्रा, तसेच पोलीस अंमलदार भरत राठोड, रविंद्र नेवारे आणि अंकुश फेंडार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींची बदनामी करणाऱ्या किंवा फेक आयडी बनवून छळ करणाऱ्या सायबर गुन्हेगारांची खैर नाही, असा इशारा या कारवाईवरून पोलिसांनी दिला आहे. तरुण-तरुणींनी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो व वैयक्तिक माहिती शेअर करताना खबरदारी बाळगावी, तसेच असा प्रकार घडल्यास घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन यवतमाळ शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
