यवतमाळ : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार संजय देशमुख यांची अविरोध निवड झाली आहे. बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. या विजयामुळे शिवसेनेची सहकार क्षेत्रातील पकड घट्ट झाली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेसने उमेदवार न दिल्याने देशमुख यांची निवड बिनविरोध झाली. दरम्यान, भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विजय जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आज सोमवारी आयोजित विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
सहकारमधील वर्चस्व काँग्रेसने गमावले
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीप्रणित बळीराजा सहकार पॅनलने २५ पैकी १६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. महाविकास आघाडीत काँग्रेसने सात व शिवसेना उबाठाच्या दोन असे नऊ संचालक आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यातील बँकेची सत्ता महायुतीने काबीज केली. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. महायुतीमध्ये शिवसेनेचे सात, भाजप तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा संचालक निवडून आले होते. त्यामुळे सत्तावाटपाचे सूत्र कसे ठरणार, याची उत्सुकता होती. अखेर अध्यक्षपद शिवसेनेकडे, तर दोन उपाध्यक्षपदे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आली.
खासदार संजय देशमुख दोन्हीवेळा अविरोध
दिग्रस तालुका गटातून बिनविरोध निवडून आलेले खासदार संजय देशमुख यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही देशमुख अविरोध झाले. महायुतीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सात संचालक असल्याने अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा प्रबळ मानला जात होता. पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्हा बँकेवर मिळविलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महागाव तालुका गटातून निवडून आलेले भाजपचे नितीन भुतडा यांची एका उपाध्यक्षपदी, तर पुसद तालुका गटातून बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जाधव यांची दुसऱ्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळाले असले तरी कुणबी, मराठा समाजाचे १६ संचालक निवडून आले असताना उपाध्यक्षपदी या समाजाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने संचालकांमध्ये नाराजीचा सूर होता.
नव्या संचालक मंडळासमोर आव्हानांचा डोंगर
दरम्यान, नव्या संचालक मंडळासमोर बँकेची आर्थिक स्थिती सुधारणे, वाढती अनुत्पादित कर्जे (एनपीए) कमी करणे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरळीत पीककर्ज पुरवठा करणे ही मोठी आव्हाने असणार आहेत. त्यामुळे ऐतिहासिक सत्तांतरानंतर बँकेचा कारभार नव्या नेतृत्वाकडून कसा चालविला जातो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
