यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात डीजेवर १०० टक्के बंदी असून मंडळांना कोणतीही सूट मिळणार नाही. मंडळापर्यंत डीजे पोहोचण्याआधीच डीजे जप्त केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी शांतता समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर हिंदुत्वादी संघटना, डीजे व्यवसायिकांसह नागरिकांनी यवतमाळात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयावर डीजे समर्थनार्थ मोर्चा काढून ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

डीजेऐवजी पारंपरिक पद्धतीने उत्सव

यवतमाळात डीजेचा आवाज बंद राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने डीजे बंदीचा निर्णय दिला आहे. जिल्हा डीजेमुक्त करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. डीजेच्या अतिरेकाला आळा घालून पारंपरिक पद्धतीने व शांततेत सण उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डीजेचे वैयक्तिक दुष्परिणाम सांगून पालकमंत्री संजय राठोड यांनीही शांतता समितीच्या बैठकीत केले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी यवतमाळ जिल्ह्यात डीजे बंदी असल्याचे स्पष्ट केले.

हिंदूच्याच सणाला डीजेबंदी का?

या निर्णयाने संतप्त झालेले डीजे व्यवसायिक, गणेशभक्त, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांनी मोर्चा काढून डीजेबंदी मागे घेण्याची मागणी केले. यावेळी ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’सह ‘जय श्रीराम’ घोषणांनी परिसर दणाणून गेला. गणेशोत्सवासाठी चार दिवस शिल्लक असताना पोलिसांनी मंडळांना डीजे वाजवू नका म्हणून नोटीस दिली. डीजेसाठी मंडळांनी लाखो रूपये आगाऊ दिले आहेत.

शिवाय हिंदूच्याच सणाला डीजेबंदी का? असा प्रश्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी यावेळी विचारला. गेल्या आठवड्यात यवतमाळच्या नगराध्यक्ष तथा मंत्री अशोक उईके यांच्या कन्या ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामागे आयोजित केलेल्या दहीहांडी उत्सवात सर्व नियम धाब्यावर बसून डीजे वाजविला, तेव्हा पोलीस कुठे होते? त्या डीजेवर कारवाई का केली नाही, असा संतप्त प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

आवाजाची मर्यादा पाळत बँड व बँजो वाजणार

विशेष म्हणजे मोर्चात सहभागी अनेक तरूण भाजपात सक्रिय असून त्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरूद्ध रस्त्यावर उतरावे लागल्याने शहरात हा मार्चा चर्चेचा विषय ठरला. भाजपचे प्रा. प्रवीण प्रजापती यांनी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका घेतली. त्यानंतर समता मैदानात पोलीस व आंदोलकांमध्ये चर्चा झाली.

तेथून मंडळाचे पदाधिकारी शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथे चर्चा होवून आवाजाची मर्यादा पाळत बँड व बँजो वाजविण्यावर एकमत झाले. दरम्यान सर्व डीजे मालकांची बैठक घेऊन कुणालाही डीजे भाड्याने देऊ नका, अशी नोटीस दिली आहे. तालुका स्तरावरही ही कारवाई होणार असून, डीजेबंदी कायम असल्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्पष्ट केले.