यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सवांमध्ये डीजे, प्लाझ्मा, बँजो आणि कर्णकर्कश इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांचा वाढता वापर ध्वनीप्रदूषणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत होता. ध्वनीप्रदूषण हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न राहता आरोग्य, समाज आणि पर्यावरणासाठी गंभीर समस्या बनला होता. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवात यवतमाळ जिल्ह्याने एक नवा पायंडा पाडला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे कडक पालन करत आणि डीजेच्या कर्णकर्कश कोलाहलाला पूर्णपणे फाटा देत यवतमाळच्या गल्लीबोळात पारंपरिक वाद्यांचा निनाद गुंजला असून, एका संस्कृतीप्रधान व पर्यावरणपूरक उत्सवाचा श्रीगणेशा झाला आहे.
पोलिसांची नियोजनबद्ध अंमलबजावणी अन् संवाद
या अभूतपूर्व बदलामागे यवतमाळ पोलीस प्रशासनाची नियोजनबद्ध भूमिका निर्णायक ठरली. न्यायालयाने दिलेल्या सूचना आणि राज्य शासनाच्या धोरणांनुसार पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले. केवळ कायद्याचा बडगा न दाखवता पोलिसांनी सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून गणेश मंडळे आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद साधण्यावर भर दिला. पोलीस ठाणे, उपविभाग आणि जिल्हास्तरावर शांतता समित्यांच्या बैठका, गणेश मंडळांच्या विशेष सभा तसेच कॉर्नर मीटिंग्सच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात आला. ध्वनीप्रदूषणाचे घातक परिणाम, कायदेशीर मर्यादा आणि नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कारवाईची माहिती देत पोलिसांनी आस्थेने नियमपालनाचे आवाहन केले, ज्याला सर्वच मंडळांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
पारंपरिक वाद्य-संस्कृतीला ‘सुगीचे दिवस’
डीजेवर बंदी आल्याने यंदाच्या गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा आणि लोकसंस्कृतीचा पुनर्जन्म पाहायला मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेली बँड पथके, ढोल-ताशा पथकांना यंदा सुगीचे दिवस आले. ढोल ताशांच्या खणखणीत आवाजात आणि तालावर लाडक्या गणरायाची स्थापना झाली व त्याच पारंपरिक थाटात निरोपही दिला गेला. अनेक मंडळांनी हरिपाठ मंडळांना मिरवणुकीत सहभागी करून घेत टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या नामघोषात पावल्या व फुगड्या खेळत मिरवणुका काढल्या. लेझीम पथकांच्या शिस्तबद्ध सादरीकरणामुळे मिरवणुकीतील उत्सवी उत्साह द्विगुणित झाला.
बालगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत… सर्वच झाले सहभागी!
डीजेच्या अति-उच्च आवाजामुळे होणारा त्रास टळल्याने यंदाच्या मिरवणुकांमध्ये सर्वसमावेशक चित्र पाहायला मिळाले. ज्या मिरवणुकांमध्ये पूर्वी ठराविक युवकच दिसत असत, तेथे यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलेही मोठ्या संख्येने फेर धरून नाचताना दिसली. पोलिसांशी कुठलाही ताण-तणाव किंवा वाद न होता, अत्यंत सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेमुक्त वातावरणात पार पडलेल्या या उत्सवाचे समाजातील सर्वच घटकांकडून कौतुक होत आहे.
२,८४४ मंडळांचा प्रतिसाद : विसर्जन प्रक्रिया वेगात
यवतमाळ जिल्ह्यात यंदा एकूण २,८४४ सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली होती. त्यापैकी शनिवारपर्यंत १,८४४ मंडळांच्या गणरायाचे विसर्जन शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडले आहे. उर्वरित १ हजार मंडळांचे विसर्जन आज रविवारी होणार आहे. हे विसर्जनही शांततापूर्ण वातावरणात पार पाडावे, असे आवाहन यवतमाळ पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवाचा धार्मिक व सांस्कृतिक आनंद कायम राखत आरोग्य, पर्यावरण आणि कायदा व सुव्यवस्थेचा सुंदर समतोल साधत यवतमाळ पोलिसांनी घडवलेला हा ‘डीजेमुक्त पॅटर्न’ संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.
