यवतमाळ : येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४२ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहार आणि त्यातून झालेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाला गुरुवारी निर्णायक वळण मिळाले.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागाच्या पथकाने आज गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात सुमारे नऊ ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली. बँकेचे तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदारांशी संबंधित ठिकाणांचा या कारवाईत समावेश असल्याचे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे.

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास हाती घेतला आहे. बँकेतील कर्जवाटप, कर्जाची रक्कम वळविणे आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

विशेष लेखापरीक्षणातून गैरव्यवहार उघडकीस

बँकेतील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या पैशांच्या कथित गैरवापराबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने बँकेचे विशेष लेखापरीक्षण केले होते. या लेखापरीक्षणात बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांनी कर्जदार, मूल्यांकनकार आणि लेखापरीक्षकांच्या संगनमताने नियमांचे उल्लंघन करून कर्जवाटप केल्याचे आढळल्याचा आरोप आहे. अनेक कर्जप्रकरणांमध्ये पुरेसे तारण नसतानाही कर्ज मंजूर करण्यात आल्याचे तसेच कर्जदारांच्या परतफेडीच्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन करण्यात आले नसल्याचे तपासात समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विशेष लेखापरीक्षणात बँकेच्या माध्यमातून सुमारे २४२ कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते. २०२४ मध्ये या प्रकरणात बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी, कर्जदार, मूल्यांकनकार आणि लेखापरीक्षकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचेही नोंदविण्यात आले आहे.

कर्जाची रक्कम अन्यत्र वळविल्याचा संशय

ईडीच्या तपासात कर्जाच्या माध्यमातून वितरित झालेली रक्कम निर्धारित उद्देशासाठी वापरण्याऐवजी अन्यत्र वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रोख रक्कम काढणे, जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नव्या कर्जाचा वापर करणे अर्थात ‘लोन एव्हरग्रीनिंग’ तसेच काही रक्कम बँकेशी संबंधित व्यक्तींच्या खात्यांमध्ये वळविल्याच्या व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. या व्यवहारांचा नेमका लाभ कोणाला झाला आणि पैशांचा अंतिम प्रवाह कुठे गेला, याचा शोध ईडी घेत आहे.

रिझर्व बँकेकडून २०२२ मध्ये बँकेचा परवाना रद्द

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रद्द केला होता. बँकेचा परवाना रद्द करण्याच्या कारवाईनंतर बँक बंद करून अवसायकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आरबीआयच्या परवाना रद्द करण्याच्या निर्णयाची नोंद डीआयसीजीसीच्या अधिकृत पत्रातही आहे. दरम्यान, बँकेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही सुरू होती. विशेष लेखापरीक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे पोलिसांकडे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता याच प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी ईडीच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

झडतीनंतर पुढील कारवाईकडे लक्ष

आज झालेल्या झडतीमध्ये कोणती कागदपत्रे, बँकिंग व्यवहारांची नोंद किंवा अन्य साहित्य जप्त करण्यात आले, याबाबत ईडीकडून अद्याप सविस्तर अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. मात्र २४२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारामागील आर्थिक साखळी, कर्जदार आणि बँक अधिकाऱ्यांमधील कथित संबंध आणि निधीच्या अंतिम वापराचा तपास आता ईडीकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. झडतीदरम्यान नेमके काय आढळले, याबाबत शहरात चर्चा असून, या कारवाईने सहकारी बँकांचे धाबे दणाणले आहेत.