यवतमाळ : जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कुऱ्हा (तळणी) परिसरात धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. आंजी नाईक येथील एका तरुण शेतकऱ्याची डोक्यावर जड वस्तूने अत्यंत अमानुषपणे प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. बाळू राम चव्हाण (४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, हा घातपात मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या जुन्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने ग्रामीण भागातील सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
कॅनॉल शेजारी सापडला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हा तळणी ते आर्णी मार्गावरील कॅनॉलच्या बाजूला एका इसमाचा रक्ताळलेल्या अवस्थेत मृतदेह पडला असल्याची माहिती बुधवारी स्थानिक नागरिकांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाचा पंचनामा केला. बाळू चव्हाण यांच्या डोक्यावर गंभीर आणि खोल जखमा आढळून आल्या, ज्यावरून एखाद्या जड हत्याराने किंवा वस्तूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जागीच खून करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल आणि घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच, गुन्ह्याचा सखोल आणि तांत्रिक सुगावा लावण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
तक्रारदार नाही; पोलिसांनी स्वतःहून घेतला पुढाकार
बाळू चव्हाण यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट व्हावी यासाठी पोलिसांनी मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचा संशय आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही भीतीपोटी किंवा इतर कारणांमुळे अद्याप कोणताही अधिकृत तक्रारदार समोर आलेला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयित पोलिसांच्या जाळ्यात
पोलीस प्रशासनाने तपासाची दिशा निश्चित करताना बाळू चव्हाण हे शेवटच्या वेळी कधी घराबाहेर पडले, काल रात्री ते कोणाकोणाच्या संपर्कात होते आणि त्यांच्यासोबत कोण व्यक्ती होत्या, याचा तांत्रिक आणि गोपनीय तपास सुरू केला आहे. संशयाच्या आधारे पोलिसांनी परिसरातील तीन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच घटनास्थळाच्या परिसरातील पेट्रोल पंप, मुख्य रस्ते आणि गावांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटंजीचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन राठोड, सुशील शर्मा आणि जमादार साजिद खान यांचे पथक या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. शवविच्छेदनाचा अधिकृत अहवाल हाती आल्यानंतर तपासाला अधिक गती मिळेल, असे पोलिसांनी सांगितलले.
