यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातील (मर्च्युरी) फ्रीझरमध्ये ठेवलेला मृतदेह कुजल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी दुपारी समोर आली. मनीष वाघमारे (५१, रा. खोजा कॉलनी, यवतमाळ) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकारामुळे संतप्त नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात एकच गोंधळ घातला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चार डॉक्टरांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
घरीच झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष वाघमारे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांना ‘संजीवन’ रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आकस्मिक मृत्यू असल्याने कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) आणण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून मृतदेह शवविच्छेदनापूर्वी शवागारातील फ्रिझरमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले.
फ्रीझरचे तापमान वाढल्याने मृतदेह कुजला?
मृतदेह ठेवताना फ्रीझरचे तापमान ३ अंश सेल्सिअस होते. नियमानुसार आज सकाळी जेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवागाराची पाहणी केली, तेव्हा फ्रीझरचे तापमान चक्क १० अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे उघड झाले. याच फ्रीझर रॅकमध्ये इतर पाच मृतदेह देखील ठेवण्यात आले होते. तापमान वाढल्यामुळे मनीष वाघमारे यांचा मृतदेह मोठ्या प्रमाणावर कुजला (डी-कंपोज) आणि त्यांचा चेहरा व शरीर फुगले. शवविच्छेदनासाठी मृतदेह बाहेर काढला असता हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी मर्च्युरी परिसरात गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा रक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली. मृताची पत्नी, मुलगी आणि दुबई येथून आलेला मुलगा यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता आणि अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेत प्रकरण जाणून घेतले. त्यांनतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार जीएमसीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञ डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. हा प्रकार फ्रीझरमधील तांत्रिक बिघाडामुळे (फ्लक्च्युएशन) झाला की मानवी निष्काळजीपणामुळे, याचा तपास ही समिती करणार आहे.
गोंधळातच शवविच्छेदन
या गोंधळानंतर शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक तपासणीत वाघमारे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (कार्डियाक अरेस्ट) झाल्याचा अंदाज असून, अधिक तपासासाठी त्यांचे हृदय हिस्टोपॅथॉलॉजी विभागाकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
