यवतमाळ – अलीकडे लग्न करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी लग्नात हुंडा घ्यायची प्रथा होती. आता लग्न इव्हेंट म्हणून साजरा करण्याचा ट्रेंड आला आहे. लग्नात एसी हॉलसारख्या भौतिक सुविधा असायलाच हव्या या अट्टहासापोटी नियोजित लग्न तर तुटलेच, पण नवरदेवासह चार जणांवर हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये थेट गुन्हाही दाखल झाला. सामाजिक चिंता ठरलेली ही घटना मारेगाव तालुक्यात घडली.
आधी कोणतीही मागणी नाही, नंतर…
मारेगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचे यवतमाळ येथील मयूर सुरेश गिरी याच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न जुळले होते. त्यानंतर १ मार्चला वणी येथे साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून दोन्ही कुटुंबे लग्नाच्या तयारीला लागली. विशेष म्हणजे, लग्नाची बोलणी करताना वरपक्षाने कोणतीही मागणी केली नव्हती. वधू पित्याने त्यांच्या पद्धतीने लग्न करावे, असे ठरले.
साक्षगंध झाल्यानंतर वधू पित्याने नातेवाईकांना सांगून लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली होती. नववधू-वराची पसंती झाल्यानंतर दोघांचेही मोबाईल संभाषण सुरू होते. दोन, तीन दिवस अवांतर संवाद झाल्यानंतर ४ मार्च रोजी वराने वधूला फोन करून लग्न एसी हॉलमध्येच झाले पाहिजे, असा हट्ट धरला. ‘एसी हॉल नसेल तर लग्न मोडले’, असे सांगून टाकले. ही मागणी तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी दबाव टाकला. मात्र, मुलीने यासंदर्भात तुम्ही स्वतः माझ्या वडिलांशी बोला, असे सांगताच मुलाने रागारागाने फोन कट केला.
वराकडून कोणताही प्रतिसाद नाही
मुलीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी मुलीकडील कुटुंबीयांनी पुढाकार घेतला असता, मुलाने कुठलाही प्रतिसाद न देता उलट लग्न मोडले असे समजा, असा एकतर्फी निर्णय जाहीर केला. मुलाच्या या पवित्र्याने वधूकडील मंडळीना चांगलाच धक्का बसला.
वेळवरच्या हट्टाने वधूचे कुटुंब धक्क्यात
या प्रकारामुळे तरुणी व तिच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला असून, अखेर वधू व तिच्या पित्याने मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत तरुणीने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयूर सुरेश गिरी (३३), त्याचे वडील सुरेश भाऊगीर गिरी (५५), नातेवाईक नामदेव भाऊगीर गिरी (६७) (सर्व रा. पिंपळगाव रोड, यवतमाळ) व सतीश दिवाकर गिरी (४५, रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) या चौघांविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम १९६१ तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
लग्नासाठी एसी हॉलची ही मागणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यावरून लग्नासाठी वाट्टेल ती डिमांड करणाऱ्या वर मुलास अद्दल घडविल्याबद्दल समाजातून कौतुक होत असले तरी वधूच्या कुटुंबियास मानसिक त्रास व धोका देणाऱ्या वरास कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके व पोलीस शिपाई संभा लेनगुरे करीत आहेत.
