यवतमाळ : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात प्रतिबंधित गुटख्याविरोधात कारवाईचा धडाका लावलेला असतानाच, यवतमाळ शहरात मात्र पोलिसांच्या वसाहतीजवळ लाखोंची अवैध साठेबाजी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यवतमाळ शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पळसवाडी सिंधी कॅम्प परिसरातील एका घरावर धडक कारवाई करत तब्बल ४० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईने जिल्ह्यातील गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्य संशयित फरार; एकाला अटक
हा संपूर्ण काळाबाजार तथाकथित ‘गुटखा किंग’ कुमार रामचंद्र ओछाणी याच्या घरातून सुरू होता. जागरूक नागरिकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या डीबी पथकाने नंदूरकर शाळा परिसरातील ओछाणीच्या घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच मुख्य सूत्रधार कुमार ओछाणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून अलीम सलीम बेग ऊर्फ सोनू (रा. मिटणापूर) याला अटक केली आहे.
कारसह पॅकिंग मशिन्स जप्त
पोलिसांनी आरोपीच्या घरातून आणि आवारात उभ्या असलेल्या एका कारमधून मोठ्या प्रमाणावर नामांकित कंपन्यांचा सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची पोती जप्त केली. जप्त केलेल्या मालामध्ये बाजीराव, ईगल, पान पराग, माझा १०८, बाबा सुगंधित तंबाखू आणि बाबा नवरतन या ब्रँड्सचा समावेश आहे.
हा अवैध साठा वाहतूक करण्यासाठी एक संपूर्ण मेटॅडोर भरून माल बाहेर काढावा लागला. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटख्याच्या सिलिंग आणि पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पॅकलिफ्ट’ कंपनीच्या दोन मशिन्सही जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत ४० लाखांवर असून, मोजदाद पूर्ण झाल्यावर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गेल्या अनेक दिवसांपासून सिंधी कॅम्पसारख्या रहिवासी भागात हा अवैध धंदा राजरोसपणे सुरू असताना, स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला याची कानोकान खबर कशी लागली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या तस्करीत काही पोलीस कर्मचाऱ्यांचीही अप्रत्यक्ष भागीदारी असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी याच तस्कर कुमार ओछाणीने दिलेल्या खोट्या बयाणावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातरजमा न करता अविनाश ढोणे, प्रशांत राठोड आणि बबलू चव्हाण या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.
आता त्याच तस्कराच्या घरातून लाखोंचा गुटखा सापडल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. फरार कुमारचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. ही संयुक्त कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आणि शहर ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
