यवतमाळ : जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा सातत्याने पंचेचाळीस अंशांच्या पुढे जात असून संपूर्ण जिल्हा तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे. कडक उन्हामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. अशा या भयानक आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये जिल्ह्यात एकाच दिवसात चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व मृतांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या सर्व घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी आढळले तीन बेवारस मृतदेह
यातील पहिली घटना दिग्रस शहरात घडली असून येथे शुक्रवारी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या भागात तिघांचे मृतदेह बेवारस आणि उघड्या स्थितीत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे मृतदेह ताब्यात घेतले. प्राथमिक वैद्यकीय अंदाजानुसार, या व्यक्तींनी मद्यप्राशन करून भरउन्हात प्रवास केला असावा आणि त्यामुळेच शरीरातील पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन त्यांना तीव्र सनस्ट्रोक बसला असावा. पोलिसांनी हे तिन्ही मृतदेह दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयातील शवागारात पाठवले. सुरुवातीला तिन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती. मात्र पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास चक्रे फिरवून एका मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळवले. कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथील आनंद राजू वाढवे (२८ ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
शनिवारी दुपारी मृत आनंदचे नातेवाईक दिग्रस येथे पोहोचल्यानंतर मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली. डॉक्टरांनी मृत्यूचे अचूक कारण शोधण्यासाठी व्हिसेराचे नमुने अमरावती येथील विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. उर्वरित दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून कायदेशीर नियमांनुसार अडताळीस तास प्रतीक्षा केल्यानंतर प्रशासनातर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या तिन्ही मृत्यूंबाबत दिग्रसचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वीरेंद्र अस्वार यांनी सांगितले की, शवचिकित्सेचे अहवाल प्रयोगशाळेतून आल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत पोलीस इतर दोघांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
उन्हापासून बचावासाठी पुलाचा आसरा घेतला, पण तिथेच मृत्यूने गाठले
दुसरी दुर्दैवी घटना बाभूळगाव तालुक्यात समोर आली आहे. येथील गवंडी ते किन्ही रस्त्यावरील एका पुलाखाली मारोतराव कोवे (६०, राहणार गवंडी) या वृद्ध इसमाचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळून आला. गावातील पोलीस पाटलांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मारोतराव हे शनिवारी दुपारी कडक उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि थोडी सावली मिळावी म्हणून रस्त्याशेजारील एका पुलाखाली विसाव्यासाठी बसले होते. मात्र, दुर्दैवाने उन्हाच्या तीव्र झळांमुळे आणि उष्णतेमुळे तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून जमादार नीलेश भुसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जिल्ह्यात उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शासकीय दफ्तरी नोंद नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत अकस्मात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आज उष्णतेचा ‘रेड अलर्ट’
हवामान विभागाने जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचा इशारा दिला होता. शनिवारी तापमानात थोडी घसरण होऊन ४३.८ अंशावर पारा स्थिरावला होता. तर रात्रीचे तापमान ३० अंशावर आले. रविवारचा दिवस अतिशय उष्ण राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्यातील हा आठवडा सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. तापमान सातत्याने ४५ अंशापुढे होते. तर रात्रीचेही तापमान ३२ अंशापुढे पोहोचले होते. ‘रेड अलर्ट’मध्ये नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये. शारीरिक श्रमाची कामे करू नये, असेही सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचे आवाहन केले आहे.
