यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला असून दारव्हा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. दारव्हा ते आर्णी मार्गावरील दहेली नजीक अडाण (कुपटी) नदीच्या पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने ईर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्या मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख झाडाचा आसरा घेतल्याने सुखरूप बचावले आहेत.

मध्यरात्री घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास अविनाश नामदेव खंडारे (४५, रा. लोणी, ता. आर्णी) हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनाने (ईर्टिगा कार) दारव्हा येथून लोणीकडे जात होते. गावानजीक आले असताना दहेली गावाजवळ अडाण नदीच्या पुलावर पुराचे पाणी वाहत होते. अंधारामुळे पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने अविनाश खंडारे यांनी गाडी पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कार थेट नदीच्या पात्रात कोसळली आणि प्रवाशांसह वाहून गेली.

पती बचावले, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा शोध सुरू

गाडी वाहून जात असताना अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखून चालत्या कारमधून बाहेर पडत नदीपात्रातील एका झाडाचा आसरा घेतला. त्यांनी मध्यरात्री झाडावरूनच मदतीसाठी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अंधार आणि पाण्याचा वाढता प्रवाह या प्रतिकूल परिस्थितीत शोधमोहीम राबवून बचाव पथकाने अविनाश खंडारे यांना झाडावरून सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

बोरी गोसावी नजीक आढळले तिघांचे मृतदेह

घटनेनंतर कारमधील इतर तिघेजण बेपत्ता असल्याने बचाव पथकाकडून शुक्रवारी सकाळपासूनच नदीपात्रात शोधमोहीम तीव्र करण्यात आली होती. अखेर आज शुक्रवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास यवतमाळ तालुक्यातील बोरी गोसावी गावाच्या हद्दीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेत माधवी अविनाश खंडारे (पत्नी), साची अविनाश खंडारे (मुलगी) आणि प्राची अविनाश खंडारे (मुलगी) या तिघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा पसरली असून खंडारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जनजीवन ठप्प

यवतमाळ जिल्ह्याला हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ग्रामीण भागातील वाहतूक आणि संपर्क पूर्णपणे तुटला असून दळणवळण ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुलावरून अथवा नाल्यावरून पाणी वाहत असताना धोकादायक प्रवास करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.