यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेती व्यवसाय आधीच संकटात आहे. अशा परिस्थितीत पांढऱ्या सोन्याच्या जिल्ह्यातील काही शेतकरी आता कापूस, तूर यांसारख्या पारंपरिक पिकांसोबत चक्क गांजाची लागवड करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत केलेल्या २२ कारवायांमध्ये तब्बल ९७८ किलो गांजा जप्त केला असून, त्याची किंमत दोन कोटी पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी या अवैध मार्गाकडे वळत आहेत का, की अधिक पैशांच्या मोहापायी हा प्रकार घडत आहे, असा प्रश्न या घटनांमुळे उपस्थित झाला आहे.
कापूस, तुरीमध्ये गांजाचे आंतरपिक
जिल्ह्यातील काही भागांत कापूस आणि तुरीच्या पिकांचा आडोसा घेऊन गांजाची लागवड केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवायांतून उघड झाले आहे. अलीकडेच घाटंजी तालुक्यातील कुंभारी शिवारात तीन एकर क्षेत्रात तूर आणि कापसाच्या पिकांमध्ये गांजाची ८४८ झाडे आढळून आली. पांढरकवडा तालुक्यातही तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. अशा घटनांमुळे हा प्रकार एखाद्या ठिकाणापुरता मर्यादित नसल्याचे दिसत आहे.
गांजाच्या लागवडीत वाढ होण्याची भीती
गेल्या काही वर्षांपासून शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना बाजारातील दरांची अनिश्चितता कायम आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल ७,७१० रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ८,११० रुपये किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी रक्कम पडते. अशा परिस्थितीत गांजाच्या लागवडीतून मिळणाऱ्या पैशांचे आकर्षण काही जणांना वाटत असावे, असा अंदाज आहे. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात गांजाची लागवड अद्याप मर्यादित स्वरूपात असली तरी त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक अडचणींमुळे काही जण चुकीच्या मार्गाकडे वळत असल्याची बाब चिंताजनक आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसोबत जनजागृतीचीही गरज आहे.
कारणांचा शोध घेण्याची मागणी
प्रगतिशील शेतकरी महेंद्र मानकर यांच्या मते, उत्पादन जास्त झाले किंवा कमी झाले तरी शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे काही लोक गांजा लागवडीकडे वळत असावेत. शासनाने शेतीच्या प्रश्नांकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहून शेती व्यवसायाची बदनामी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक आणि आर्थिक कारणांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली. शेतात अमली पदार्थांचे पीक घेतले जात असेल तर ही बाब अधिक चिंताजनक आहे. गांजाच्या लागवडीवर कठोर कारवाई होणे आवश्यकच आहे; परंतु शेतकऱ्यांना कायदेशीर शेतीतून सन्मानजनक उत्पन्न मिळण्याची हमी देणारी व्यवस्था उभी करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
