यवतमाळ : विदर्भ – मराठवाडा सीमावर्ती भागातील पुसद तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर) धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे इसापूर धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे शनिवारी सायंकाळपासून धरणाचे तीन तर आज रविवारी सकाळी सात दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीच्या पात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नदीकाठच्या विदर्भ व मराठवाड्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास इसापूर धरणाच्या सांडव्याची तीन वक्रद्दारे दहा सेंटिमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात १०२१ क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला. रात्रीतून पाणी पातळीत वाढ झाल्याने आज रविवारी धरणाचे सात दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले आहे. यातून ११८०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. इसापूर धरणाची पाणी पातळी ४४०.८१ मीटर झाली असून उपयुक्त पाणीसाठा ९४५.९२ दलघमी (९८.१२ टक्के) इतका झाला आहे.

हे ही वाचा…बुलढाणा: हजारो भाविकांचा मेळा, पावणेचारशे दिंड्या; शेगावात गजानन महाराज पुण्यतिथीचा उत्साह

तसेच इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून ६९८ क्युसेस इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने इसापूर धरणाच्या सांडव्याची सात वक्रदारे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने पैनगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होऊन पूरूपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून विदर्भ , मराठवाड्यातील पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरांवरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,उमरखेड,महागाव, हिंगोली जिल्ह्यातीलकळमनुरी तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट येथील तहसीलदारांना इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाचे खरदारीचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा…गुलाब पुरींच्या गणपतींच्या वादग्रस्त देखाव्याबाबत उत्सुकता

पाऊस शिवारात, पर्जन्यमापक यंत्र मंडळात

परिसरातील पावसाची नोंद करणारे पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळात, तर पाऊस शिवारात असा प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे. भरपूर पाऊस कोसळूनही पर्जन्यमापक यंत्रामध्ये पावसाची नोंद होत नाही. त्यामुळे महसूल मंडळातील पर्जन्यमापक यंत्र नावालाच आहेत. पावसाचा लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देताना मंडळातील पर्जन्यमापक यंत्रावरील नोंदीनुसार पावसाची नोंद केली जाते. सध्या पावसाच्या लहरीपणाम्ळे मंडळात पाऊस नाही, तर परिसरातील गावात अतिवृष्टी होते. मात्र, त्या पावसाची नोंद होत नसल्याने पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान होऊनही फक्त पावसाची नोंद नसल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे महसूल मंडळासोबतच प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी होत आहे.