यवतमाळ : गाड्यांचे पार्ट्स दुरुस्त करायला शिकतानाच आता हाताखाली स्टिअरिंगही पकडता येणार आहे! यवतमाळसह राज्यातील तब्बल १६५ शासकीय आयटीआयमध्ये लवकरच अधिकृत ‘वाहन चालक प्रशिक्षण शाळा’ सुरू होत आहेत. कौशल्य विकासासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ड्रायव्हिंगचे धडे देऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की काय आहे ही संकल्पना?
तंत्रशिक्षण व कौशल्य विकास विभागाने आयटीआयच्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ज्या संस्थांमध्ये ‘मेकॅनिक मोटार व्हेइकल’ हा ट्रेड उपलब्ध आहे, तिथे ही ड्रायव्हिंग स्कूल सुरू केली जाईल. बऱ्याचदा तांत्रिक ज्ञान असूनही ड्रायव्हिंग येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीं नोकऱ्या गमावाव्या लागतात. आता ही अडचण दूर होईल. केवळ आयटीआयचे नियमित विद्यार्थीच नाही, तर बाहेरचे तरुणही अल्प दरात इथे ड्रायव्हिंग शिकू शकतील.
आरटीओची मान्यता अन् तयारी वेगात
या उपक्रमासाठी आयटीआय प्रांगणात ड्रायव्हिंग ट्रॅक उभारले जात असून आवश्यक वाहनांची सोय केली जात आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अधिकृत परवानगी मिळवण्यासाठीची कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रवेश कसा मिळणार?
आयटीआयच्या अधिकृत केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग स्कूलचा अर्ज भरावा लागेल. आरटीओच्या नियमांनुसार सुरुवातीला ‘लर्निंग लायसन्स’साठी (शिकाऊ परवाना) ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. लायसन्स मिळाल्यावर आयटीआय मधील प्रशिक्षित निदेशकांकडून प्रत्यक्ष ड्रायव्हिंगचे धडे मिळतील. चाचणी पूर्ण झाल्यावर पक्के लायसन्स हातात येईल.
खासगी ड्रायव्हिंग स्कूल्सचा विरोध!
शासकीय आयटीआयमध्ये अत्यंत रास्त दरात आणि अधिकृत ड्रायव्हिंग ट्रेनिंग मिळणार असल्याने आपल्या व्यवसायावर कुऱ्हाड पडेल, अशी भीती खासगी ड्रायव्हिंग स्कूल चालकांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
अधिकारी काय म्हणतात?
यवतमाळ येथील आयटीआयचा प्रस्ताव आमच्याकडे आला असून त्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल. ड्रायव्हिंग स्कूलसाठी परिवहन नियमानुसार ऑनलाइन अर्ज करावा लागतो. यासाठी दोन्ही बाजूंनी ब्रेक व क्लच असणारी (ड्युअल कंट्रोल) कार आणि नियमानुसार पात्र प्रशिक्षक असणे बंधनकारक आहे, अशी माहिती यवतमाळचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल सूर्यवंशी यांनी दिली.
