यवतमाळ : तळपता उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या झळांनी सध्या माणसांनाच नाही, तर जंगलातील वन्यप्राण्यांनाही कासावीस केले आहे. पाण्याचा एक-एक थेंब मिळवण्यासाठी जंगलातील मुके जीव किती कासावीस झाले आहेत, याचा अंगावर काटा आणणारा आणि मानवी संवेदनशीलतेची साक्ष देणारा एक हृदयस्पर्शी प्रकार पुसदच्या खंडाळा घाटात पाहायला मिळाला. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या एका माकडाने थेट एसटी बसचा रस्ता अडवला आणि बसमधील संवेदनशील प्रवाशांनीही देवदूतासारखे धावून येत आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्या रिकाम्या करत या मुक्या जीवांची तहान भागवली.
लालपरी रोखली आणि सुरू झाला पाण्याचा शोध
गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास, सूर्य आग ओकत असताना वाशिमवरून पुसदकडे प्रवाशांनी खच्चून भरलेली धुळे-यवतमाळ ही एसटी बस खंडाळा घाटातून जात होती. अचानक घाटातील एका तीव्र वळणावर एक माकड थेट रस्त्याच्या मधोमध येऊन बससमोर उभे ठाकले. चालकाने तातडीने ब्रेक दाबल्यामुळे मोठा अपघात टळला. चालकाने आणि काही प्रवाशांनी हॉर्न वाजवून, आवाज देऊन माकडाला बाजूला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते माकड जागेवरून हलण्यास अजिबात तयार नव्हते. माणसांना पाहून जंगलात पळणारे माकड आज थेट वाहनासमोर उभे राहून जणू पाण्याची भीक मागत होते.
प्रवाशांची संवेदनशीलता आणि माकडांचा आटापिटा
माकडाचे ते व्याकुळ डोळे आणि सुकलेला चेहरा पाहून बसमधील प्रवाशांनी त्याचा मूक टाहो ओळखला. या जीवाला कमालीची तहान लागली असणार, असा अंदाज बांधून एका प्रवाशाने बसच्या खिडकीतून जवळच्या बाटलीतील पाणी खाली ओतले. पाणी दिसताच त्या माकडाने ज्या पद्धतीने घटघट पाणी पिण्यास सुरुवात केली, ते पाहून प्रवाशांचे काळीज हेलावले. माकडाला पाणी मिळत असल्याचे पाहताच जंगलातून त्याच्या इतर सहकाऱ्यांची अख्खी टोळी रस्त्यावर धावून आली. लहान-मोठी माकडे पाण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत होती. हा प्रसंग पाहून बसमधील अबालवृद्धांनी कसलाही विचार न करता स्वतःसाठी पिण्याकरिता ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या पुढे केल्या.
प्रवाशांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे घाटातील तो रस्ता काही काळासाठी माणुसकीचा मार्ग बनला होता. प्रवाशांपैकी एक असलेल्या लता श्रीवास यांनी हा संपूर्ण थरार आणि माणुसकीचा ओलावा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रत्येकाचे डोळे ओलावतो आहे.
वन विभागाचा निष्काळजीपणा
प्रवाशांच्या संवेदनशीलतेमुळे या टोळीची तहान तात्पुरती भागली असली, तरी या घटनेने वन विभागाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे दावे वन विभागाकडून केले जातात. कागदावर लाखो रुपयांचा निधी प्राण्यांच्या पाण्यासाठी खर्च दाखवला जातो. मग जर ही व्यवस्था चोख आहे, तर खंडाळा घाटातील माकडांना पाण्यासाठी थेट रस्त्यावर येऊन वाहने अडवण्याची वेळ का आली? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
कायमस्वरूपी उपायांची गरज
जेव्हा जंगलातील प्राणी पाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येतात, तेव्हा त्यांच्या अपघाताचा आणि शिकारीचा धोका प्रचंड वाढतो. प्रवाशांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असली तरी ती कायमस्वरूपी सोय नाही. वन विभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता खंडाळा घाटासह जिल्ह्यातील सर्वच वनक्षेत्रांतील पाणवठ्यांमध्ये प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे, जेणेकरून कोणत्याही मुक्या जीवाला पाण्यासाठी रस्त्यावर असे लाचार व्हावे लागणार नाही.
