यवतमाळ – महागाव नगरपंचायतच्या अध्यक्ष सुनंदा दिलीप सुरोशे (कोपरकर) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सभागृहातील १२ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे आज मंगळवारी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला. दोन दिवसांपूर्वी महागाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या कथित अपहरणनाट्यानंतर लगेचच नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद उर्फ शाका भरवाडे, भाजपचे नगरसेवक गजानन साबळे, सुरेश नरवाडे, रंजना आडे, आशा बावणे, रामराव नरवाडे, विशाल पांडे, सुनीता डाखोरे, करुणा शिरबिरे यांच्यासह सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक मो. परवेज शफी सुरैया, जयश्री इंगोले आणि जयश्री नरवाडे यांनी हा प्रस्ताव दाखल केला. उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी नगराध्यक्षांविरोधातील या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आणि ते स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करताना उपस्थित होते, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या अविश्वास प्रस्तावावर सभागृहात ठराव पारित करण्यासाठी प्रत्यक्ष मतदान केले जाणार असल्याची माहिती आहे.

या ठरावासाठी नेमके किती नगरसेवकांचे बहुमत आवश्यक आहे, यावरून सध्या राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. महागाव नगरपंचायत सभागृहात एकूण १७ नगरसेवक आहेत. सध्या अध्यक्षांच्या विरोधात १२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र नगरपंचायत व नगरपरिषद कायद्यानुसार, नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एकूण नगरसेवकांच्या दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे किमान १२ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्यास दोन तृतीयांश बहुमत पूर्ण होते. नगरसेवकांचे हे संख्याबळ पुरेसे असून अविश्वास ठराव निश्चितपणे पारित होईल, असा दावा विरोधी नगरसेवकांनी केला आहे.

राजकीय व कायदेविषयक तज्ज्ञांच्या मते, थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणायचा असल्यास दोन तृतीयांश बहुमताचा हा निकष लागू होतो. मात्र, नगरसेवकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करायचा असल्यास, काही प्रकरणांमध्ये फक्त अपूर्णांक न धरता पूर्णांक बहुमत गृहीत धरले जाते, म्हणजेच १२ पेक्षा अधिक म्हणजे १३ नगरसेवकांचे समर्थन आवश्यक ठरते.

सुनंदा कोपरकर या नगरसेवकांमधून निवडून आलेल्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित होण्यासाठी १३ नगरसेवकांचे बहुमत लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अध्यक्षांच्या बाजूने पाच नगरसेवक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हा अविश्वास ठराव पारित होणार नाही असा दावा नगराध्यक्षांच्या समर्थकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेला हा अविश्वास प्रस्ताव सभागृहात नेमका कोणत्या नियमांच्या आधारे घेतला जातो, यावरच महागाव नगरपंचायतच्या राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.