यवतमाळ : श्रद्धा आणि भक्ती जिथे एकवटते, तिथे अशक्य गोष्टीही शक्य होतात, याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे गुरुवारी आला. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर येथील ग्रामदैवत मरिमाय मंदिरात तब्बल ९ बैलगाड्या कंबरेला बांधून ओढण्याची अंगावर शहारे आणणारी परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी हा कठीण मान मरिमाय भक्त उमेश अंबदास सोनबावने यांनी भूषविला.

काय आहे ही आगळीवेगळी परंपरा?

बोरी अरब येथील ही प्रथा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वत्र कुतूहलाचा विषय ठरली आहे. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी एक भक्त आपल्या कंबरेला मजबूत दोरखंड बांधतो. या दोरखंडाला एकामागे एक अशा नऊ बैलगाड्या जोडल्या जातात. विशेष म्हणजे, या नऊही गाड्या रिकाम्या नसून त्या भाविकांनी पूर्णपणे भरलेल्या असतात. स्वामी चंद्रशेखर मंदिर ते मरिमाय मंदिर या साधारण अर्धा किलोमीटरच्या अंतरापर्यंत हा भक्त या जड गाड्या आपल्या अंगाच्या शक्तीने आणि मरिमायच्या नावाच्या जयघोषात ओढत नेतो.

भक्ती आणि नवसाची जोड

या प्रथेची सुरुवात कशी झाली, याबाबत कोणतीही अधिकृत लेखी नोंद नसली तरी, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथेनुसार, एका भक्ताने मरिमायकडे नवस बोलला होता. ‘माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी स्वतःच्या कंबरेला भाविकांनी भरलेली गाडी बांधून मंदिरापर्यंत ओढत आणीन,’ असा तो नवस होता. तो नवस पूर्ण झाला आणि तेव्हापासून ही ‘गाडी ओढण्याची’ प्रथा बोरी अरबच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली.

उमेश सोनबावने यांनी जपला वारसा

यावर्षी मरिमायचे निस्सीम भक्त उमेश अंबदास सोनबावने यांनी हा मान स्वीकारला. हजारोंच्या जनसमुदायासमोर, ‘मरिमाय की जय’ आणि ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषात उमेश यांनी प्रचंड वजनाच्या या नऊ गाड्या ओढण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी हा थरार आपल्या डोळ्यांत साठवला आणि अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.

शिस्त आणि उत्साह

गाडी ओढण्याच्या या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामस्थ आणि तरुण मंडळांनी विशेष दक्षता घेतली होती. कडक उन्हाची तमा न बाळगता भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ही परंपर शारीरिक शक्तीचे प्रदर्शन नसून ती भक्तांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक मानली जाते.

ऐतिहासिक वारसा असलेल्या बोरी अरबमधील या अनोख्या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. ही परंपरा पुढील पिढीही तितक्याच श्रद्धेने पुढे चालवेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.