यवतमाळ : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यात शीतलहर आली आहे. आज बुधवारी यवतमाळचे तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील सर्वाधिक थंडीचा दिवस म्हणून आजचा दिवस ओळखला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी जिल्ह्यात ९ अंश तापमानाची नोंद झाली. हा दिवस सर्वात कमी तापमानाचा असल्याचे सांगितले जात असतानाच आज बुधवारी सकाळी तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके खाली आले. त्यामुळे नागरिक उबदार कपडे घालून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा >>> “मंत्र्यांनी खुर्च्या वाचवण्यातच गमावले अधिवेशन”, रोहित पवार म्हणतात…

ठिकठिकाणी शेकोटी पेटविल्याचे चित्र शहरात आणि गावात बघायला मिळत आहे. सर्वांनाच हुडहुडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे. सलग तीन दिवस सरासरीच्या तापमानापेक्षा घट नोंदविली गेली तर शीतलहर असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन दिवसांत तापमानात घट झाल्याने ही शीतलहर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून सरकारी कार्यालयातही थंडीचा परिणाम जाणवत आहे. याच काळात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे असल्याने ते सुद्धा थंडीने प्रभावित झाले आहे. थंडीत जेष्ठ नागरिक व बालकांची आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.