यवतमाळ : ‘राजकारण हा शेवटी पैशांचाच खेळ असतो’ हे जाहीर गुपित यवतमाळच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. निवडणूक कोणतीही असो, तिथली सत्तेची गणिते आणि आर्थिक सुबत्ता यांचे एक वेगळेच समीकरण असते. मात्र, विधान परिषदेच्या या निवडणुकीत शंभर टक्के पैशांचाच खेळ रंगणार, हे आता उमेदवारांच्या अधिकृत मालमत्ता विवरणावरून स्पष्ट झाले आहे. रिंगणात उतरलेले तिन्ही प्रमुख उमेदवार केवळ करोडपती नसून अब्जावधींच्या मालमत्तेचे धनी आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय चुरस आता एका आर्थिक लढाईत बदलली आहे.

उमेदवारांची आर्थिक कुंडली: कोण किती पाण्यात?

या संपूर्ण निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी हे आर्थिक आघाडीवर सर्वात पुढे आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, चतुर्वेदी यांच्याकडे स्वतःची तब्बल ३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे ४२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय ३ कोटी ७३ लाखांची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात दुष्यंत यांनी ४२ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले असून, त्यांच्या पत्नी शीतल चतुर्वेदी यांचे उत्पन्न ८८ लाख ४३ हजार रुपये इतके प्रचंड आहे. विशेष म्हणजे, चतुर्वेदी यांच्यावर १० कोटी ९९ लाखांचे, तर त्यांच्या पत्नीवर १७ कोटी ७ लाख रुपयांचे मोठे कर्जही आहे. सतीश चतुर्वेदी यांच्यासोबतच्या संयुक्त भागीदारी फर्ममधूनही त्यांना मोठे उत्पन्न मिळते.

महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे हेही संपत्तीच्या बाबतीत कुठेही मागे नाहीत. त्यांचे २०२४-२५ मधील वार्षिक उत्पन्न १९ लाख ४९ हजार रुपये असून त्यांच्या नावावर ६९ लाख ९० हजारांची जंगम आणि ४१ लाख ३३ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी वंदना कांबळे यांच्या नावावर ८४ लाख १३ हजारांची जंगम आणि ३६ लाख ७० हजारांची स्थावर मालमत्ता नोंदवलेली आहे.

भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले नितीन भुतडा यांनी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे. भुतडा यांच्याकडे २ कोटी ४४ लाख ८९ हजार रुपयांची तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भुतडा यांचे स्वतःचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ४१ हजार रुपये इतके आहे, तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८ लाख ३ हजार रुपये आहे.

नगरसेवकांना ‘अच्छे दिन’ आणि मतदानाचे गणित

या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ४४६ नगरसेवक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांची संख्या अत्यंत मर्यादित आणि निश्चित असल्यामुळे साहजिकच प्रत्येक मताला सोन्याचे मोल आले आहे. अद्याप निवडणुकीत सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली उघड चुरस किंवा जनआंदोलन दिसत नसले, तरी पडद्यामागे मात्र मोठ्या आर्थिक आणि राजकीय घडामोडी घडत आहेत. मतदार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी धनशक्तीचा जोरदार वापर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने स्थानिक नगरसेवकांमध्ये ‘अच्छे दिन’ आल्याची मिश्कील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी भाजप नेते मुंबईकडे रवाना

नितीन भुतडा यांच्या अपक्ष बंडखोरीमुळे महायुतीच्या गोटात, विशेषतः शिवसेनेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि जागावाटपातील अंतर्गत तडजोडीसाठी जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेते तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. या मुंबईतील वरिष्ठांच्या बैठकीत बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांच्याबाबत काय अंतिम निर्णय होतो, यावरच आता या निवडणुकीचे भवितव्य आणि संपूर्ण गणिते अवलंबून आहेत. मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे आता स्थानिक भाजप नगरसेवकांचे आणि राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.