यवतमाळ : भाजपाने दबावाचे राजकारण करूनही स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (शिंदे)पक्षाला परंपरेप्रमाणे ही जागा मिळाली. शिवसेनेने येथे दुसऱ्यांदा विद्यमान विधान परिषद सदस्य दुष्यंत चतुर्वेदी यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे गेले काही दिवस येथील उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला.

अखेर उमेदवार आयात केला

या निवडणुकीत स्थानिक निष्ठावंत विरुद्ध ‘आयात’ उमेदवार असा जुनाच संघर्ष पुन्हा एकदा नव्याने उभा राहताना दिसत आहे, असे भाकित ‘ लोकसत्ता’ ने यापूर्वीच वर्तवले होते. ते अखेर खरे ठरून, शिवसेना नेते, उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. चतुर्वेदी यांच्याशिवाय शिवसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड तसेच संजय राठोड यांचे निकटस्थ सलीम खेतानी यांची नावे चर्चेत होती. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवला होता. मात्र पक्षाने आज अखेरच्या क्षणी दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा बाहेरचा उमेदवार दिला गेला.

शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली असून आता या जागेसाठी शिवसेना (शिंदे) विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे. काँग्रेसकडून उमरखेड येथील साहेबराव कांबळे हे उमेदवार राहणार असल्याची चर्चा आहे. वृत्त लिहीपर्यंत काँग्रेसने अधिकृतपणे उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. पण, कांबळे यांनी अर्ज दाखल केल्याने तेच उमेदवार असतील असे सांगितले जाते. भाजपाने ही जागा मिळावी म्हणून शिवसेनेवर दबावाचे राजकारण केले. मात्र ही जागा राखण्यात त्यांना यश आले नाही.

आता निवडणुकीच्या निमित्ताने घोडेबाजार तेजीत येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवण्याची रणनीती आखली आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार असा प्रचार करून काँग्रेस महायुतीमधील असंतुष्ट मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असून, त्यादृष्टीने भेटी गाठींचे सत्र सुरू केले आहे.

केवळ नगरसेवकांना मतदानाची संधी

यावेळी निवडणुकीत केवळ नगरसेवक मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नसल्याने एकूण ४४६ मतदार (नगरसेवक) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे कागदावर महायुतीचे पारडे जड दिसते. महायुतीकडे भाजप (१२५), शिवसेना (१०७), राष्ट्रवादी अजित पवार गट (२९) असे एकूण २६१ मते आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस (९९), शिवसेना उद्धव ठाकरे गट (२३), राष्ट्रवादी शरद पवार गट (३) असे एकूण १२५ मते आहेत. याशिवाय एमआयएम (७), वंचित (५), जनशक्ती (२०) आणि तब्बल २० अपक्ष नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार आहेत.

‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ चा फंडा

महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले, तरी या निवडणुकीचा इतिहास पाहता अर्थपूर्ण घडामोडीत पक्षीय निष्ठा अनेकदा दुय्यम ठरते. त्यातच यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य नसून केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे सदस्य मतदार आहेत. काही नगरसेवकांमध्येच आयात उमेदवार अधिक फायद्याचा आणि व्यवहार्य ठरतो अशी उघड धारणा असल्याने या निवडणुकीतील ‘अर्थकारणा’ची व्याप्ती स्पष्ट होत आहे. बहुमताचा आकडा नसतानाही काँग्रेसने शड्डू ठोकल्याने, येथे मोठ्या प्रमाणावर ‘क्रॉस व्होटिंग’ घडवून आणण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या २० ते ३० मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ आणि गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी?

दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव असून, त्यांनी काँग्रेसमधूनच आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. ते विविध शैक्षणिक, कृषी आणि सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. २०२० मध्ये तत्कालीन शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था गटात विधान परिषद निवडणूक लढली आणि ते जिंकले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव केला होता. आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था गटात विधान परिषदेत जाण्याची संधी शिवसेना (शिंदे) पक्षाने दिली आहे.