यवतमाळ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांसाठी एक सुवार्ता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून यंदाच्या आषाढी वारीसाठी तब्बल २७० विशेष बसेस रस्त्यावर धावणार आहेत. २० ते २९ जुलै या यात्रा कालावधीत जिल्ह्यातील वारकऱ्यांचा प्रवास सुकर, सुरक्षित आणि विनासायास व्हावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

थेट गावापासूनच पंढरपूर वारी!

यंदा एसटी महामंडळाने विठ्ठल भक्तांचा प्रवास अधिक आनंददायी केला आहे. एखाद्या गावातून किंवा विशिष्ट परिसरातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांचा स्वतंत्र गट एकत्र येत असेल, तर त्यांच्या मागणीनुसार थेट त्यांच्या गावापासूनच विशेष बस पंढरपूरसाठी सोडली जाईल. अशा यात्रेकरूंना एसटीची ही ‘होम डिलिव्हरी’ मिळणार आहे. यामुळे भाविकांना मुख्य बसस्थानकापर्यंत येण्याचा नाहक त्रास वाचणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक भाविक, भजनी मंडळे किंवा सामाजिक संस्थांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

अमरावती प्रदेशातून १०३० बसेस

आषाढी यात्रेच्या काळात राज्यभरातून तब्बल पाच हजार ५०० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये अमरावती प्रादेशिक विभागाचा वाटा मोठा असून, या प्रदेशातून एकूण एक हजार ३० एसटी बसेस भाविकांच्या दिमतीला असतील. त्यात यवतमाळ आणि बुलढाणा डेपोतून प्रत्येकी२७० तर अकोला २६० आणि अमरावती डेपोतून २३० बसेस सोडल्या जाणार आहेत.

यंत्रणा आणि ‘मेकॅनिकल टीम’ २४ तास सेवेत

लाखो भाविकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यात्रास्थळी व प्रवासाच्या मार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहेत. प्रवासादरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण किंवा बस नादुरुस्त झाल्यास वारकऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी महामंडळाने एक विशेष यांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. ही टीम तातडीने दुरुस्तीचे काम करेल, जेणेकरून भाविकांना विनाअडचण विठूमाऊलीचे दर्शन घेता येईल.

भीमा यात्रा देगाव येथे तात्पुरते बसस्थानक

पंढरपूर येथे पोहोचणाऱ्या आणि तेथून परतीचा प्रवास करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी भीमा यात्रा देगाव येथे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. परतीचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी याच स्थानकावरून बसेस सोडल्या जातील. या संपूर्ण यात्रेच्या वाहतूक नियोजनाची धुरा सांभाळण्यासाठी चंद्रपूरचे विभागीय वाहतूक अधिकारी कन्हैय्या भोगे यांची भीमा यात्रा देगाव बसस्थानकावर ‘यात्रा प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संपूर्ण यात्रा व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्यासाठी बुलढाण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांनी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करावा, असे आवाहन यवतमाळचे विभागीय वाहतूक अधिकारी देवराव दराडे यांनी केले.