यवतमाळ : जागतिक पातळीवर, विशेषतः आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. या जागतिक घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारातही अभूतपूर्व इंधन टंचाई आणि दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. या महागाईचा थेट फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत असून, यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता कंबर कसली आहे.
महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने आता थेट ‘मायलेज’ वाढवण्यावर भर दिला असून, प्रति आगार दैनंदिन पाच लिटर डिझेल बचतीचे कडक उद्दिष्ट निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या चालकांना प्रोत्साहनपर भत्ता आणि विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
डिझेल महागले; एसटीच्या तिजोरीवर ताण
गेल्या अवघ्या पंधरवड्यात डिझेलच्या दरात प्रतिलिटर तब्बल ७ ते ८ रुपयांची वाढ झाली आहे. काही काळापूर्वी नियंत्रित असलेले दर आता ९७ रुपयांच्या पार गेल्याने महामंडळाच्या दैनंदिन बजेटचे गणित कोलमडले आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीचा परिचालन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा खर्च आटोक्यात आणला नाही, तर त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवांवर होऊ शकतो. म्हणूनच, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज, बनली असल्याचे एसटीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
लाखो रुपयांची बचत
एकट्या यवतमाळ विभागात एकूण ९ आगार आहेत. महामंडळाच्या नव्या नियमानुसार, प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेलची बचत करणे अनिवार्य आहे. एका आगारातून ५ लिटर म्हणजेच संपूर्ण यवतमाळ विभागातून दिवसाला ४५ लिटर डिझेल वाचणार. या सुटसुटीत नियोजनामुळे महिन्याला हजारो लिटर डिझेलची आणि पर्यायाने लाखो रुपयांची थेट बचत होईल, असा राज्य परिवहन विभागास विश्वास आहे. या वाचलेल्या निधीचा वापर प्रवासी सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि गाड्यांच्या देखभालीसाठी करणे सुलभ होणार आहे.
‘लो-मायलेज’ चालकांचे कौन्सेलिंग व फेरप्रशिक्षण
महामंडळाने केवळ आदेश न काढता प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. ज्या चालकांच्या बसचे ‘केपीएल’ (किलोमीटर प्रतिलिटर) प्रमाण सरासरीपेक्षा कमी येत आहे, अशा चालकांची यादी तयार केली जात आहे. त्यांना योग्य गतीने गाडी चालवून इंधनाचा अपव्यय टाळणे. योग्य वेळेत योग्य गिअर टाकण्याचे कौशल्य. बस स्थानकावर किंवा सिग्नलला अनावश्यक इंजिन सुरू ठेवण्याची सवय बंद करणे. अचानक आणि तीव्र ब्रेक लावण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे. या तांत्रिक मुद्द्यांवर ‘कमी केपीएल’ असलेल्या चालकांचे समुपदेशन करून त्यांना संस्थात्मक फेरप्रशिक्षण दिले जाणार आहे.
आगारांमध्ये रंगणार स्पर्धा; रोख पुरस्कार आणि सन्मान
या मोहिमेला चळवळीचे स्वरूप देण्यासाठी एसटी महामंडळाने ‘इन्सेन्टिव्ह’ मॉडेल लागू केले आहे. डिझेल बचतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांना महिन्याच्या पगारात अतिरिक्त भत्ता जोडला जाईल. तसेच, निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त डिझेल वाचवणाऱ्या आगारांना दरमहा विशेष आर्थिक प्रोत्साहन आणि फिरती ढाल दिली जाईल. यामुळे आगारांमध्ये अंतर्गत सकारात्म स्पर्धा निर्माण होऊन महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.
