यवतमाळ : संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात सध्या सूर्याचा आगडोंब उसळला असून, पाणीटंचाईमुळे उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची चर्चा आहे. नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा येथील एका नऊ वर्षीय चिमुकलीचा शुक्रवारी सायंकाळी अचानक मृत्यू झाला असून, तिचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. अनवी अनाडी भोसले (९), असे मृत मुलीचे नाव आहे.
पाण्यासाठी पायपीट आणि नंतर मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. चिमुकली अनवी शुक्रवारी रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी गेली होती. दिवसभर उन्हात तिची पायपीट झाली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तिला अचानक चक्कर आली आणि ती जागीच कोसळली. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
वैद्यकीय प्रशासनाची भूमिका
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘अनवीला आधीपासून काही आजार, ताप किंवा फिट येण्याचा त्रास होता का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याशिवाय स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र पालकांनी शव विच्छेदनाची परवानगी दिली तरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल’, असे जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. अजंती पारधी बेडा येथे आरोग्य विभागाचे पथक रवाना झाले आहे. पाण्यासाठी एका बालिकेचा बळी गेल्यानंतर पाणीटंचाईबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे बेड्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात उष्णतेची लाट
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, उष्ण वारे वाहत आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. अशातच लहान मुले आणि वृद्धांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनवीचा मृत्यूही उन्हात फिरल्याने आणि पाण्याच्या कमतरतेमुळे झाल्याचा अंदाज स्थानिक नागरिक वर्तवत आहेत.
प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना वाढत्या उन्हापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काम नसेल तर दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा, अशा सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात येत आहेत. अनवीच्या मृत्यूनंतर आता तरी प्रशासन ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे अजंती पारधी बेड्यावर शोककळा पसरली असून, एका निरागस चिमुकलीचा उन्हाने बळी घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
