यवतमाळ : बनावट जन्म-मृत्यू नोंदीच्या तपासाच्या दृष्टीने विशेष तपास पथकाने (एसआयटी) गेले दोन दिवस जिल्ह्यात कसून चौकशी केली. आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी या दीड हजार लोकसंख्येच्या गावात या बनावट नोंदी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. या गावात विशेष तपास पथकाने धडक देत चौकशी केली. यावेळी पथकाने उपस्थित गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांकडून प्रकरणाची सखोल माहिती घेतली. यासोबत रजिस्ट्रर तसेच इतरही बाबींची पाहणी केली.

आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीत नोंद झालेल्या २७ हजार ३९७ जन्म आणि ११ मृत्यू नोंदीचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. या प्रकरणी देशभरातील विविध ठिकाणाहून आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक गठीत केले. या पथकाचे अध्यक्ष तथा सायबर सेलचे अपर पोलीस महासंचालक यशस्वी यादव, आरोग्य उपसंचालक बबिता कमलापूरकर यांनी शनिवारी यवतमाळ गाठले. सुरवातीला पोलिसांनी केलेल्या तपासाच्या दृष्टीने माहिती घेण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांनी दिलेली माहिती पथकाने जाणून घेतली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पथकातील आरोग्य उपसंचालक बबिता कमलापूरकर, सायबर सेलचे दिलीप जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे, आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खारोडे, ग्रामपंचायत अधिकारी आदींनी शेंदुरसनी गाव गाठले. यावेळी प्रकरणाची सखोल माहिती गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंचाकडून घेण्यात आली. तत्कालीन जबाबदार अधिकारी, कर्मचार्‍यांशी संवाद साधला. साधारणतः पाऊणतास समितीचे सदस्य गावात उपस्थित होते.

दरम्यान, समितीने प्रकरणाची संपूर्ण माहिती संकलित केली आहे. आता लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत संकलित केलेली माहिती सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

किरीट सोमय्या आज यवतमाळात

आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी येथील बनावट जन्म, मृत्यू नोंदीच्या प्रकरणानंतर भाजप नेते किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले. एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन दिवसांपासून एसआयटीचा यवतमाळ जिल्ह्यात मुक्काम होता. आवश्यक माहिती एसआयटीच्या अध्यक्षांनी घेतली. या पथकाच्या तपासनंतर आता या प्रकरणाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेण्याकरिता आज मंगळवारी भाजप नेते किरीट सोमय्या यवतमाळात येणार असल्याची माहिती आहे. ते सुद्धा शेंदूरसनी येथे भेट देणार असल्याचे सांगण्यात येते.