यवतमाळ : ‘माऊली… माऊली…’ हा गजर दरवर्षी आषाढीला अवघ्या महाराष्ट्राला कवेत घेतो. डोळ्यांत विठूरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखो वारकरी पंढरीची वाट चालतात. पण, ज्यांच्या नशिबात हे जग पाहण्याचे सुख नाही, ज्यांच्या डोळ्यांसमोर फक्त अंधार आहे, ते जेव्हा पंढरीची वाट धरतात, तेव्हा ही वारी भक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाचा एक अभूतपूर्व सोहळा ठरते.
दिव्यांग वारीचा अनुपम सोहळा
महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळकरांनी कोरलेला दिव्यांग वारीचा हा सुवर्ण क्षण पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठान ट्रस्ट, यवतमाळ अंतर्गत दिव्यांग सेवा समिती द्वारा ‘संत सूरदास महाराज दिव्यांग (अंध) पायी वारी २०२६’ चे यंदा ४ जुलै रोजी यवतमाळून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या वारीचे हे तिसरे वर्ष आहे. जगाला डोळे उघडूनही न दिसणारा तो सावळा विठ्ठल, या दृष्टिहीन माऊलींना अंतर्मनाने दिसणार आहे.
५२१ किलोमीटरचा टप्पा आणि विठ्ठल भेटीची ओढ!
होय, हे पूर्णपणे सत्य आहे. ज्यांना चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो, ते दिव्यांग बांधव आणि भगिनी यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल ५२१ किलोमीटरचा टप्पा पायी पार करणार आहेत. वाटेत २२ गावांचे थांबे घेत, भेगाळनाऱ्या पायांची तमा न बाळगता, केवळ आणि केवळ विठ्ठल नामाच्या गजर करत ही पाऊले पुढे पडणार आहेत. शनिवार, ४ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता यवतमाळ येथील सरोज टॉकीज जवळील रुक्मिणी पांडुरंग संस्थान येथून या वारीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान होणार आहे.
कसा असणार भक्तीचा हा खडतर प्रवास?
४ जुलै रोजी यवतमाळवरून निघालेला हा दिंडी सोहळा रोज नवनवीन गावा पार करत २५ जुलैला विठूरायाच्या दारी पोहोचेल. वारीचा २२ गावात मुक्काम राहणार आहे. हिवरी, आर्णी, दिग्रस, पुसद, शेंबाळपिंपरी, कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, हट्टा, परभणी, पोकर्णी, गंगाखेड, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, पावनधाम, कळंब, येरमाळा, बार्शी, कुर्डूवाड, शेटफळ, रोपडे असा प्रवास करत ही दिंडी २५ जुलै रोजी पंढरपूर येथे ही दखल होऊन विठ्ठल दर्शन दर्शन घेणार आहे.
वारी दृष्टीहीनांची, पण समाजाची साथ मोलाची!
या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे, या अंध माऊलींच्या प्रवासाची, त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय महाराष्ट्रातील संवेदनशील अन्नदात्यांनी आणि यजमानांनी आनंदाने उचलली आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावातील दानशूर व्यक्ती आणि संस्था या दिव्यांग वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत. हे दृश्यच माणसाच्या माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारे आहे. सन २०२४ मध्ये दिव्यांगांनी पहिली पायी वारी काढून महाराष्ट्राच्या इतिहासात यवतमाळचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले होते. तोच वारसा पुढे चालवत सेवा समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष आणि वारी संयोजक प्रशांत विश्वनाथराव बनगीनवार आणि प्राची प्रशांत बनगीनवार यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राठी, डॉ. आलोक गुप्ता, सचिव अनंत कौलगिकर, कोषाध्यक्ष दीपक बागडी आणि दिव्यांग सेवा प्रकल्पाची संपूर्ण टीम या सोहळ्याच्या नियोजनात अहोरात्र झटत आहे. अंध मुलांचा कर्णधार प्रज्वल तुमसरे आणि अंध मुलींची कर्णधार सोनम ठाकरे यांच्या खांद्यावर वारीच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
चला, आपणही होऊया या आनंदाचे साक्षीदार…
डोळे नसूनही ज्यांच्या मनात श्रद्धेचा सूर्य प्रकाशमान आहे, त्या दिव्यांग माऊलींना निरोप देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी यवतमाळकरांनी ४ जुलैला सकाळी रुक्मिणी पांडुरंग संस्थान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अशा अनोख्या आणि डोळ्यांत श्रद्धेचा सागर सामावलेल्या या भक्ती सोहळ्याला मनोभावे वंदन करून ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!’ असा गजर करत या वारीला पंढरपूरकडे रवाना करण्यासाठी यवतमाळकरही उत्सुक आहेत.
