यवतमाळ : भारतासह परदेशातही गुन्हेगारी जगतात कुप्रसिद्ध असलेल्या लॉरेन्स बिश्नोई व बिन्नी गुज्जर टोळीतील ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ला यवतमाळ पोलीसांनी सिनेस्टाईल अटक केली. रघुवीर सिंह उर्फ रघु उर्फ भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा जनरल सिंग, (३५) रा. अहारना खुर्द, पो.स्टे मेहटीयाना, जि. होशियारपूर, पंजाब असे आरोपीचे नाव आहे. यवतमाळ शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक जांब मार्गावरील दांडेकर ले आऊट मधील एका घरात ही कारवाई करण्यात आली.
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई व बिन्नी गुज्जर टोळीतील स्लीपर सेलचा कॉन्ट्रॅक्ट किलर यवतमाळ नाव बदलून वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नियोजन करून ही मोहीम फत्ते केली. या कारवाईत पंजाब, राजस्थान पोलिसांना खुनासह विविध गंभीर गुन्ह्यात ‘ मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या या कुख्यात गुन्हेगारास यवतमाळ पोलिसांनी अटक केल्याने अनेक हाय प्रोफाइल गुन्ह्यांचा छडा लावण्यात तपास यंत्रणांना मदत होणार आहे. हा आरोपी पंजाब व राजस्थान पोलिसांना अनेक गुन्ह्यांमुळे हवा होता. त्याला पकडण्यासाठी अनेक राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जात होते. राजस्थानमध्ये त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भूपेंद्र सिंग हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगचा गुंड असून त्याचा पंजाब आणि राजस्थान या राज्यामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध शस्त्र वापर, विक्री अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांत सहभाग आहे. राजस्थानमधील बाडनेर येथील हरपालसिंग उर्फ रिंकू रा. गंगानगर याचा २०२३ मध्ये खून करून तो यवतमाळला परत आला होता. या टोळीसाठी तो कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करायचा. टोळीकडून गुन्हा करण्याचे आदेश मिळाल्यानंतर ते काम फत्ते करून तो परत यवतमाळात यायचा. तो यवतमाळात ढाबा चालवत असल्याचे सांगत होता. त्याच आधारे त्याने भाड्याची खोली मिळवून तो इथे राहत होता. त्याला अमेरिकेतून दरमहा २५ हजार रुपये मिळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमेरिकेतून गँगस्टर बिल्लू गुज्जर याचा भाऊ तसेच गोल्डी ब्रार याचा मित्र सौरव गुज्जर हा आरोपी भूपेंद्र सिंग ऊर्फ भिंडा याला डॉलरमध्ये पैसे पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या तीन वर्षांपासून भिंडा याला हे पैसे मिळत होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे टोळीकडून आदेश आल्यानंतर तो गुन्हा करण्यासाठी सज्ज राहत होता, असे तपासात पुढे आले.
बिश्नोई व गुज्जर गँग भारतातील गुन्हेगारी जगतात नावाजलेली गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट किलींग व खंडणी यासारखे गंभीर गुन्हे घडविण्यासाठी गँगस्टर भिंडा सारख्या आरोपींना ओळख लपवून वापरत असल्याचे चौकशीतून पुढे आले. त्यासाठी ते गुन्हेगारांना दरमहा वेतन देतात तसेच शस्त्रे, वाहन पुरवून कोणता गुन्हा करायचा याची वेळेवर माहिती देऊन त्यांच्याकडून गुन्हे करून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, विनोद राठोड, निलेश राठोड, आकाश सहारे, ममता देवतळे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.
खुनाच्या गुन्ह्यात २० वर्षाची शिक्षा
या कारवाईनंतर यवतमाळ पोलिसांनी राजस्थान जिल्हा पोलीसांशी तत्काळ समन्वय साधून गुन्हेगाराविषयी तसेच गँग विषयी संपूर्ण माहिती संकलीत केली. रघुवीर उर्फ रघु उर्फ भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा जरनल सिंग याच्या ओळखीची आणि गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी करण्यात आली. आरोपीला यापूर्वी खूनाच्या गुन्ह्यात २० वर्ष व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात १० वर्ष अशी शिक्षा झालेली आहे. या दोन्ही गुन्ह्यांत तो फरार असतानाच त्याने बाडमेर येथे सुपारी घेवून हरपालसिंग उर्फ रिंकू याचा खून केल्याची माहिती पंजाब व राजस्थान पोलीसांकडून मिळाली आहे.