यवतमाळ : कर्तव्यातील गंभीर कसुरी आणि गैरवर्तनामुळे जिल्हा पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांवर थेट सेवेतून बडतर्फीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल ५२९ दिवस अनधिकृत गैरहजर राहिलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा, तर गुटख्याच्या वाहनावर प्रतिबंधात्मक कारवाई न करता पैशांची मागणी करून स्वीकारल्याचा ठपका असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणांसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील एकूण २६ प्रकरणांमधील अधिकारी आणि अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भात नुकतीच सुनावणी झाली. मात्र बडतर्फीचे आदेश अद्याप निघाले नाही. परंतु, या प्रस्तावित कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
२६ अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित
यातील एका प्रकरणात पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई युवराज राठोड हे १९ नोव्हेंबर २०२४ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत तब्बल ५२९ दिवस अनधिकृतपणे गैरहजर असल्याने नमूद आहे. त्यांच्या या गंभीर गैरवर्तनामुळे सेवेतून बडतर्फीची शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात वसंतनगर, नेर आणि दराटी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई अनुक्रमे बबलू पठाण, प्रशांत राठोड आणि अविनाश ढोणे या तिघांवर गुटख्याच्या वाहनावर प्रतिबंधात्मक कारवाई न करता पैशांची मागणी करून ते स्वीकारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांनाही सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यास त्यांना पोलीस दलातील नोकरी गमवावी लागू शकते.
तीन वर्षापर्यंत वेतनवाढ रोखली
दरम्यान, अन्य प्रकरणांमध्ये तपासात दिरंगाई, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांच्या तपासात कसूर, फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती न करणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंदविण्यात हलगर्जीपणा, कर्तव्यावर गैरहजर राहणे अशा विविध बाबींचा समावेश आहे. संबंधितांवर एक ते तीन वर्षांपर्यंत वेतनवाढ रोखणे, सक्त ताकीद आणि विभागीय चौकशी अशा शिक्षाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे (दिग्रस) यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आदी पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील शिस्त आणि कर्तव्यपालनाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे जिल्हा पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.
बाजू ऐकून घेतली, आता आदेशाची प्रतीक्षा
सर्व संबंधितांची बाजू पोलीस अधीक्षकांनी २८ ऑक्टोबरला ऐकून घेतली. आता या संदर्भात ते काय आदेश देतात, याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
