यवतमाळ : नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक खळबळजनक घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले, त्या होणाऱ्या पतीने लग्नाआधीच तरुणीवर दोनवेळा बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, अत्याचार करूनही मन भरलं नाही म्हणून सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी या नराधमाने लग्न मोडल्याची संतापजनक घटना घडली आहे.
यवतमाळमधील एका सुशिक्षित तरुणीचे लग्न छत्रपती संभाजीनगर येथील लोकेश राजेंद्र तोनगिरे (२७) याच्याशी ठरले होते. मोठ्या उत्साहात यवतमाळात साखरपुडाही पार पडला. लग्नाची तयारी सुरू असतानाच तरुणीच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेसाठी लोकेश यवतमाळला आला. मात्र, घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीवरच जबरदस्तीने पाशवी अत्याचार केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानंतर एका प्रवासादरम्यानही त्याने पुन्हा तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
पीडितेच्या कुटुंबाने साखरपुड्यासाठी आधीच चार लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर लग्नासाठी सात लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. पीडितेच्या आईने ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याची विनंती केली. मात्र, लोकेश आणि त्याच्या नातेवाईकांनी, सात लाख रुपये आताच द्या, अन्यथा लग्न मोडू, अशी धमकी दिली. परिस्थितीमुळे हतबल असणाऱ्या आई-वडिलांची विनंती धुडकावून लावत त्यांनी थेट लग्न मोडल्याचे जाहीर केले.
पीडितेने या छळाला कंटाळून अखेर न्यायासाठी लोहारा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी मुख्य आरोपी लोकेश तोनगिरे याच्यासह हुंड्याची मागणी करून लग्न मोडणाऱ्या मयूर राजेंद्र तोनगिरे, सौरभ मयूर तोनगिरे, मोहिनी राजेंद्र तोनगिरे, अर्चना संदीप तोनगिरे, संदीप भाऊलाल तोनगिरे, मनीष जीवनालाल यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पोलीस या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. लग्न ठरल्यानंतर होणाऱ्या पत्नीवर अत्याचार करून हुंड्यासाठी तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या टोळीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता यवतमाळकरांमधून होत आहे.
काळजी घ्या
विवाह सोहळा थाटामाटात करण्याचा सध्या ट्रेंड आला आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे लग्न सोहळा करण्याकडे तरुण पिढीचा कल आहे. त्यासाठी प्रत्येक इव्हेंटचे फोटोसेशन करण्याचे फॅड आले आहे. या फोटोसेशनच्या निमित्ताने होणारे पती, पत्नी आऊटिंगसाठी जातात. अशावेळी मुलींवर जबरदस्ती करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यानंतर लग्न मोडल्याच्या घटनाही घडत असल्याने, पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन विवाह समुदेशकांनी केले आहे.
