यवतमाळ : सध्याच्या राजकीय वातावरणात भ्रष्टाचार आणि पक्षांतर्गत वादाच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. मात्र एका बड्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत महिला कार्यकर्त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर चक्क एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पत्नीने ‘बॉम्ब’ टाकून पक्ष कार्यालयात चालणाऱ्या अनैतिक कारभाराचा जाहीर भांडाफोड केला आहे. या प्रकारामुळे संबंधित पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत.
अधिकृत ग्रुपवर रात्री पडला ‘तो’ संदेश!
एका मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पक्षाच्या महिला कार्यकारिणीच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर रात्री ९ वाजताच्या सुमारास एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या पत्नीने सर्वांची झोप उडवणारा हा संदेश टाकला. त्यात तिने, “तुमच्या पक्ष कार्यालयात अत्यंत खालच्या दर्जाचे प्रकार सुरू आहेत. तिथे उघडपणे लफडे चालतात. यामुळे माझे हसतेखेळते आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे!”, असा संदेश टकाला. या मेसेजने ग्रुपवरील महिला सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
‘हा फॅमिली मॅटर नाही!’
हा मेसेज ग्रुपवर येताच पक्षातील काही ज्येष्ठ महिला नेत्यांनी प्रसंगावधान राखत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संबंधित महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करत, ‘हा तुमचा फॅमिली मॅटर आहे, तो ग्रुपवर टाकू नका,’ असा सल्ला दिला. मात्र, संतप्त झालेल्या त्या महिलेने सडेतोड उत्तर देत, ‘हा कोणताही कौटुंबिक वाद नाही, तर पक्ष कार्यालयातील मॅटर आहे!’ असे स्पष्ट केले. या उत्तरामुळे मध्यस्थी करणाऱ्या नेत्यांचीही बोलती बंद झाली.
वरिष्ठ नेत्यांनी दाखवली उदासीनता!
आपल्या मेसेजमध्ये त्या महिलेने अत्यंत गंभीर आरोप करताना सांगितले की, तिने पक्ष कार्यालयातील अनैतिक प्रकाराबाबत आणि तिच्या आयुष्यात आलेल्या वादळाबाबत पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांनी कोणतीच दखल न घेतल्याची खंत बोलून दाखविली. कोणीच लक्ष देत नाही म्हणून समुहात संदेश टाकून पक्षातील महिलांना सतर्क करत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे. ‘माझ्यासोबत घडले ते इतरांसोबत घडू नये’, अशी विनंतीही तिने केली आहे. वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणाची साधी दखलही न घेतल्याने तिला हा भांडाफोड करावा लागल्याची चर्चा आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपवर जिल्ह्यातील असंख्य सक्रिय महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या जोडलेल्या आहेत. एका जबाबदार पदाधिकाऱ्याच्या पत्नीनेच अत्यंत गंभीरपणे हा आरोप केल्यामुळे, ग्रुपमधील इतर महिलांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्ष कार्यालयातून सर्व कारभाराचा ‘ट्रेंड’?
राजकारणात केवळ नेत्यांची ‘हाजी हाजी’ करून मोठी कंत्राटे किंवा कामे मिळवणे, त्याच पैशाच्या जोरावर अनैतिक मार्गांचा अवलंब करून पक्ष कार्यालयांचे पावित्र्य धोक्यात आणणे, हा एक नवा ‘ट्रेंड’ बनू पाहत असल्याची चर्चा शहरात आहे. या कार्यालयातून कंत्राट वाटप, प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट आदेश देण्याचे काम चालत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नैतिकतेच्या गोष्टी करणाऱ्या प्रतिष्ठित पक्षाच्या कार्यालयातील या अंतर्गत वादाने आणि घाणेरड्या प्रकाराने राजकीय क्षेत्र हादरून गेले आहे. या प्रकारानंतर पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
