यवतमाळ : ज्या पोस्टमनच्या खांद्यावरील पिशवीकडे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आशेने पाहतात, ज्याच्या हाकेत कुणाची तरी नोकरी, कुणाचे पेन्शन तर कुणाचे कोर्टाचे भविष्य दडलेले असते, त्याच विश्वासाला पांढरकवडा येथे काळिमा फासला गेला आहे. कर्तव्यदक्षतेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या एका पोस्टमनने चक्क नागरिकांच्या स्वप्नांना स्वतःच्या घरात डांबून ठेवले. टपालचोर असलेल्या पोस्टमनने नागरिकांच्या नावे आलेले पत्र, महत्वाची कागदपत्र, कॉल लेटर्स, एटीएम कार्ड चक्क आपल्या घरात दडवून ठेवली. संशयावरून पोस्टमनच्या घराची झडती घेतली असता, महत्त्वाच्या कागदपत्रांची तीन पोती लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पांढरकवडा येथील ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले. मागील वर्षभरापासून त्यांची महत्त्वाची कायदेशीर पत्रे आणि पुस्तके गायब होत होती. संशयाची सुई पोस्टमन सतीश धुर्वे याच्याकडे वळली. २२ डिसेंबर रोजी धुर्वे कामावर नसताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेण्यात आली, तेव्हा समोरचे दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले. एका कोपऱ्यात धुूळ खात पडलेली तीन मोठी पोती जप्त करण्यात आली. ही पोती उघडली असता अनेकांच्या नोकरीचे ‘कॉल लेटर्स’, बँकेचे एटीएम आणि क्रेडिट कार्ड्स तर अनेकांच्या आयुष्याची पुंजी असणाऱ्या जीवन विमा पॉलिसी, अनेकांचे आधार कार्ड आणि महत्त्वाच्या कोर्ट नोटिसा आढळल्या. हे सर्व साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी या महाभागाने घरात सडत ठेवले होते.

पोस्टमनचे हे प्रताप उघडकीस आल्यानंतर त्याला जाब विचारण्याऐवजी प्रभारी पोस्टमास्तर अमोल पातोळे यांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. या घोटाळ्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्याऐवजी पातोळे यांनी चक्क अरेरावी केल्याचा आरोप आहे. तुम्ही आत कसे आलात? तुमच्याविरोधात तक्रार करू, अशी धमकी देत त्यांनी या गंभीर प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्याने जनतेचा विश्वास विकला असताना, अधिकारी त्याला पाठीशी का घालत आहेत? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, वणी उपविभागीय पोस्टमास्तर यांचा चौकशी अहवाल प्राप्त व्हायचा आहे. हा अहवाल आल्यानंतर पोस्टमन सतीश धुर्वे यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती यवतमाळ मुख्य डाकघर अधीक्षक मोहन निकम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

पोस्टमनकडून विश्वासघात

पोस्टमन म्हणजे केवळ सरकारी कर्मचारी नसून तो कुटुंबाचा एक भाग मानला जातो. मात्र, सतीश धुर्वे याने केलेल्या या कृत्यामुळे कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले, तर कित्येक तरुणांना नोकरीच्या संधीला मुकावे लागले लागल्याची शक्यता आहे. डिजिटल इंडियाच्या युगातही ‘पोस्टा’वर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या सामान्य जनतेच्या पाठीत पोस्टमननेच खंजीर खुपसल्याची जनभावना झाली आहे.