यवतमाळ : माणुसकीला लाजवेल आणि अंगावर शहारे आणणारी एक संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काकडदाती येथे घडली आहे. एका ४० वर्षीय तरुणाला सार्वजनिक ठिकाणी नग्न करून, त्याचे हात-पाय दोरीने बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष कृत्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम हुलकाने (४०, रा. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. १ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ ही थरारक घटना घडली. सखारामला विठ्ठल भाकरे याच्या घरासमोर आणण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या नराधमांनी सखारामवर हल्ला चढवला.

अंगावरचे कपडे काढून मारहाण

आरोपींनी सखारामच्या अंगावरील कपडे काढून त्याला पूर्णपणे विवस्त्र केले. एवढ्यावरच न थांबता, त्याचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधले जेणेकरून तो स्वतःचा बचाव करू शकणार नाही. यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि इतर वस्तूंनी त्याला जीवघेणी मारहाण करण्यास सुरुवात केली. सखाराम वेदनेने विव्हळत होता, मदतीसाठी याचना करत होता, परंतु आरोपींनी तो निपचित पडेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप आहे.

बघ्यांची गर्दी, पण बचाव नाही

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी सखारामला भरचौकात नग्न करून मारले जात होते, तेव्हा तिथे बघ्यांची गर्दी होती. मात्र, एकानेही त्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. तो निपचित पडेपर्यंत आरोपींचे तांडव सुरू होते.

मृत्यूशी झुंज अपयशी

सखारामचा चुलत भाऊ शिवानंद याला या घटनेची माहिती मिळताच त्याने घटनास्थळी धाव घेतली. त्याने सखारामला कपडे घालून घरी आणले. मात्र, मारहाण इतकी भीषण होती की सखारामची प्रकृती खालावत गेली. त्याला तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर गंभीर अवस्थेत नांदेड येथील विष्णुपूरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज संपली.

पोलीस कारवाई आणि अटक

याप्रकरणी शिवानंद हुलकाने याने दिलेल्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली. विठ्ठलराव भाकरे, वैभव विठ्ठल भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन भाकरे, योगेश उत्तम भाकरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रकरणाचे गूढ कायम

इतक्या टोकाच्या रागातून एका तरुणाला नग्न करून मारण्यामागे नक्की कोणते कारण होते? जुने वैर होते की काही अनैतिक प्रकार? याचे गुढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुसद शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गोपाळ इंद्राळे यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यातील सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.