यवतमाळ : गोरगरिबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणारा रेशनचा तांदूळच दिवाळीच्या तोंडावर काळ्या बाजारात विक्रीसाठी वळविला जात असल्याचा गंभीर प्रकार महागाव तालुक्यात उघडकीस आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि महागाव पोलिसांनी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ४४०.७३ क्विंटल तांदळासह दोन ट्रक जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, चालक, ट्रक मालक आणि तांदळाच्या मालकांसह आठ जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महागावमधून धान्याची अवैध वाहतूक

महागाव तालुक्यात रेशनच्या धान्याची अवैध वाहतूक होत असल्याचे या दोन कारवायांतून समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पुसद कॅम्प पथकाने नागपूर-तुळजापूर मार्गावर एक ट्रक (एमएच-२६ बीई-१८२१) पकडला. या ट्रकमध्ये तांदळाची पोती आढळली. चालक अंबादास नंदू व्यवहारे याच्याकडे तांदळाच्या खरेदीची पावती, बिल्टी अथवा वाहतुकीचा वैध परवाना मागितला असता, त्याला कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तहसील प्रशासनाकडून धान्याची पडताळणी केली. या तपासणीत ट्रकमधील १९४.९६ क्विंटल तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चालक अंबादास व्यवहारे, शेख शौकत शेख महताब आणि देगलूर येथील वाजिद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत अडीचशे क्विंटल तांदूळ जप्त

दुसरी कारवाई २३ ऑक्टोबर रोजी महागाव पोलिसांनी महागाव-नांदगव्हाण मार्गावर केली. नांदगव्हाणजवळ ट्रक (क्र. एमएच-२६ एडी-१७७८) संशयास्पद स्थितीत आढळला. चालक मोहम्मद खलील मोहम्मद शफी याच्याकडे तांदळाच्या वाहतुकीसंबंधी कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. तहसील प्रशासनाने केलेल्या तपासणीत ट्रकमधील २४५.७७ क्विंटल तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद खलील, ट्रकमालक शेख अतिक शेख खदीर तसेच तांदळाचे मालक रोहित श्यामसुंदर गोयंका, बालाजी व्यंकटराव जाधव आणि हरजी संभाजी राजेगोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तब्बल ४४० क्विंटल सरकारी धान्य काळ्या बाजारात?

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४४०.७३ क्विंटल तांदूळ आणि दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणातील मुद्देमालाची किंमत सुमारे २७ लाख रुपये, तर दुसऱ्या प्रकरणातील मुद्देमालाची किंमत २७ लाख ४४५ रुपये असल्याचे नमूद आहे. जप्त केलेल्या या तांदळाची किंमत तब्बल ५४ लाख रुपये इतकी आहे. पुरवठा विभाग अशा काळात काय करते, हा प्रश्न या कारवाईनंतर चर्चेत आला आहे.

रेशनच्या धान्याची साखळी उघड होणार का?

रेशन दुकानांमधून गरजू लाभार्थ्यांना वितरित होणारे धान्य मोठ्या प्रमाणात ट्रकद्वारे काळ्या बाजारात कसे पोहोचते, हा या कारवाईनंतर महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे धान्य नेमके कुठून आले, कोणत्या रास्तभाव दुकानातून अथवा पुरवठा साखळीतून त्याची उचल झाली आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. केवळ वाहतुकीदरम्यान ट्रक पकडण्यापुरती कारवाई मर्यादित न राहता रेशनच्या धान्याच्या कळ्याबाजारामागील मूळ साखळी उघड करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.