लोकसत्ता टीम यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या आज शुक्रवारी घोषित झालेल्या निकालात मुलींनी उत्तीण होण्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.४९ टक्के लागला. अमरावती विभागात जिल्हा टक्केवारीत तळाला आहे. ९४.९४ टक्के घेत नेर तालुका प्रथम क्रमांकावर, तर ८७.४७ टक्के घेत राळेगाव तालुका जिल्ह्यात शेवटच्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३६ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १९ हजार १९० मुले व १७ हजार ३९३ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्षात १८ हजार ८८० मुले व १७ हजार २०९ मुली, अशा एकूण ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण ३३ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १६ हजार ७८४ मुले व १६ हजार २३७ मुलींचा सामवेश आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८८.८९ तर मुलींची टक्केवारी ९४.३५ इतकी आहे. सात हजार ८५९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी मिळाली. १२ हजार ४८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, नऊ हजार ९०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर दोन हजार ७७८ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले. हेही वाचा. भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के यवतमाळ तालुक्याचा निकाल ९३.८ टक्के, दारव्हा ९१.४३, दिग्रस ९०.४१, आर्णी ९१.९६, पुसद ९३.५, उमरखेड ९०, महागाव ९१.७३, बाभूळगाव ९०.१, कळंब ८९.९, मारेगाव ९२.९७, पांढरकवडा ९०.७९, झरी ८९.६२, वणी ८९.९७ आणि घाटंजी तालुक्याचा निकाल ९१.८६ टक्के लागला.