शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विरोधात स्थानिक शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राठोड यांच्या विदर्भ हाऊसिंग सोसायटीमधील जनसंपर्क कार्यालय व टिळक वाडीतील निवासस्थानी केंद्रीय राखीव दलाच्या सशस्त्र तुकडीची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून पक्ष फोडल्यानंतर दोन दिवसांनी आमदार राठोड गुवाहाटी येथे पोहचून शिंदे गटात सहभागी झाले. राठोड यांच्या बंडखोरीमुळे जिल्ह्यात शिवसेनेत अनेक मतप्रवाह आहेत. मात्र तिन्ही जिल्हाप्रमुखांनी राठोड यांचे समर्थन न करता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली आहे. रविवारी उमरखेड येथे राठोड यांच्यासह बंडखोरांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. आज शिवसेनेने यवतमाळमध्ये मोर्चा काढून बंडखोरांचा निषेध नोंदवला.

या अनुषंगाने राठोड यांच्या कार्यलयात व निवासस्थानी केंद्रीय राखीव दलाच्या सशस्त्र तुकडीचे संरक्षण कवच देण्यात आले आहे. निवासस्थानी सहा व कार्यलयात आठ जवानांचा खडा पहारा आहे. ही तुकडी पुणे येथून आली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दुपारी राठोड यांच्या कार्यलयात पोहचून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. केंद्राने बंडखोर आमदारांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट केल्याने राजकारणातील पुढील चित्र स्पष्ट झाल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.