यवतमाळ : शिवसेना पक्षातील फुटीचे नाट्य आणि राजकीय घडामोडींवरील संतापाचे लोण आता थेट यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. शिवसेना (उबाठा) चे यवतमाळ- वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित बंडखोरीनंतर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या बंडखोरीच्या निषेधार्थ आज गुरूवारी यवतमाळमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

दोन पंजा चौकात तीव्र आंदोलन, पुतळ्याला जोडे मारले

यवतमाळ येथील दोन पंजा चौकात झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “गद्दारी खपवून घेणार नाही…” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी जोडे मारून आपला तीव्र संताप व्यक्त केला आणि त्यानंतर या पुतळ्याचे दहन केले.

आमदार संजय देरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा संताप

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उबाठा)चे वणीचे आमदार संजय देरकर यांनी केले. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना आमदार संजय देरकर यांनी संजय देशमुख यांनी पैशांसाठी पक्षासोबत आणि मतदारांसोबत गद्दारी केल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी ज्या विश्वासाने संजय देशमुख यांना निवडून दिले, त्यांनी त्या विश्वासाला तडा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी स्वतः यवतमाळ जिल्ह्यात ५ सभा घेतल्या होत्या. तरीही पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, अशी टीका दरेकर यांनी केली.

‘ऑपरेशन टायगर’ आणि ६० कोटींचा गंभीर आरोप

आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी आणि नेत्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात सध्या पैशांच्या बळावर लोकप्रतिनिधी विकत घेण्याचे सत्र सुरू आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत जवळपास ५०० कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये प्रत्येक खासदाराला ६०-६० कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात आले आहे,” असा खळबळजनक आरोप आमदार देरकर यांनी केला. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, हे यवतमाळचा सामान्य शिवसैनिक आता मैदानात उतरून दाखवून देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनानंतर यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.