एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन बंडाळी केल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद आता जिल्ह्यात उमटत आहेत. आज उमरखेडमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंसह जिल्ह्यातील माजी मंत्री, दिग्रसचे आमदार संजय राठोड, पालकमंत्री संदिपान भुमरे, खासदार भावना गवळी यांचे एकत्रित पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. बंडखोर नेते मतदारसंघात आल्यास त्यांना बदडून काढू, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.

उमरखेडमधील माहेश्वरी चौक, गायत्री चौक, संजय गांधी चौकात आज रविवारी शिवसैनिकांनी आंदोलन केले. ‘पक्षासोबत गद्दारी करून बंड करणाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी बंडखोरांच्या प्रतिमांना चपला मारल्या. सर्व शिवसैनिकांनी आपण राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत असल्याचे यावेळी सांगितले. आंदोलनात शिवसेनेचे नेते चितांगराव कदम, बळीराम मुटकुळे, राजीव खांमनेकर, प्रशांत पत्तेवार, अरविंद भोयर, सतीश नाईक, संदीप ठाकरे, अमोल तिवरंगकर, गजेंद्र ठाकरे, रेखाताई भरणे, राहुल सोनवणे, वसंता देशमुख, नीलेश जैन, संजय पळसकर, बालाजी लोखंडे, अमोल नरवाडे आदींसह शिवसेनेचे तालुका व शहर, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, युवा सैनिक सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

आज यवतमाळात आंदोलन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ उद्या २७ जून रोजी दुपारी १२ वाजता यवतमाळ येथे टिळक स्मारक मंदिरात शिवसेना आजी, माजी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मोर्चा काढून दत्त चौक येथे निदर्शने करण्यात येणार आहे. ही परीक्षेची वेळ असल्याने सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड यांनी केले आहे.