यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी हिरा राखी देशमुख हिची व्हिएतनाम येथे होणाऱ्या सातव्या आशिया आंतरराष्ट्रीय युवा शिखर संमेलनासाठी  निवड झाली आहे. या जागतिक मंचावर ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असून शनिवारी ती व्हिएतनाममधील ‘हो ची मिन्ह’ शहराकडे रवाना झाली आहे.

आशिया खंडातील १५ ते ३५ वयोगटातील तरुण, तरुणींसाठी व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथे फेब्रुवारी महिन्यात चार दिवसीय सातवे आशिया युवा शिखर संमेलन होत आहे. या संमेलनात  ‘जागतिक परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर जगभरातील तरुण आपले प्रकल्पांचे सादरीकरण करणार आहेत. या संमेलनाचा मुख्य उद्देश तरुण, तरुणींना जागतिक आव्हाने पेलण्यासाठी सक्षम करणे, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि हवामान बदल या क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करून शाश्वत उपाय शोधणे, तरुण सहभागींना त्यांचे कल्पक स्टार्टअप्स किंवा सामाजिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्याची संधी देणे, आशियातील विविध देशांतील तरुणांशी संवाद साधण्याची आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची संधी देणे हा आहे.

या संमेलनासाठी देशभरातून अनेक तरुणांचे अर्ज आले होते. अत्यंत कठीण मुलाखत प्रक्रिया, नेतृत्व क्षमता आणि युवकांना प्रेरित करण्याची कौशल्ये या निकषांवर हिरा देशमुखची निवड झाली आली आहे. विशेष म्हणजे, या संमेलनाचा संपूर्ण खर्च आयोजकांकडून केला जाणार आहे. या संमेलनासाठी हिरा आज रवाना झाली आहे.

हिरा ही बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची धनी असून, अवघ्या १६ वर्षांच्या हिराच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. ती सध्या वायपीएस शाळेत अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. नागपूर येथील एमयूएनबीमध्ये तिला ‘बेस्ट व्हर्बल मेंशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने अनेक कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. हिरा धनुर्विद्येत पारंगत असून तिला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड आहे. या आवडीमुळे ती विद्यार्थ्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम करते. झरी-जामणी येथील राजीव गांधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. राखी देशमुख यांची ती कन्या आहे.

त्यांच्या राजराजेश्वरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही हिराचा सहभाग असतो. हिराच्या या यशामुळे यवतमाळच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुली जागतिक स्तरावर नेतृत्व करू शकतात, हे हिराने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले. हिराच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.