यवतमाळ : होळी म्हणजे वाईटाचा नाश करण्याचा सण. यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्येला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे. होळीच्या दिवशी जंगलाला लागलेला वणवा जिवाची पर्वा न करता विझवून या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने ‘पर्यावरणस्नेही होळी’ साजरी केली. त्यांच्या या धाडसाचे आणि समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी सायंकाळी सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या मागच्या बाजूस यवतमाळ वनपरिक्षेत्रातील महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या राखीव वनाचा काही भाग लागून आहे. होळीच्या सायंकाळी, जेव्हा सर्वत्र होळी पेटवण्याची तयारी सुरू होती, त्याच वेळी या राखीव वनक्षेत्रात अचानक वणवा पेटला. वाळलेला पालापाचोळा आणि वारा यामुळे आगीने रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली होती. ही बाब महाविद्यालयात होळी साजरी करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जंगलाकडे धाव घेतली. महाविद्यालयात बीएसडब्ल्यू भाग १, २ आणि ३ मधील सुमारे ५० ते ६० विद्यार्थी वृक्षपूजनाच्या कार्यक्रमासाठी जमले होते. मात्र, निसर्गाचे नुकसान होत असल्याचे पाहून त्यांनी सामाजिक जाणीव जपत उत्सवाऐवजी कर्तव्य निभावण्याला प्राधान्य दिले.
सर्वच विद्यार्थी प्राध्यापकांसह जंगलात पोचले. आग अधिक पसरू नये म्हणून ‘फायर लाईन’ तयार केली. जमिनीवरील सागाचा सुका पालापाचोळा झाडून बाजूला केला. अग्निशमन दलाची वाट न पाहता, विद्यार्थ्यांनी झाडांच्या हिरव्या फांद्यांचे झाडपं तयार करून आगीला इतरत्र पसरण्यापासून रोखले. होळीच्या पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आणि मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत सुमारे एक किलोमीटर परिसरात पसरलेली आग अर्ध्या ते पाऊण तासाच्या अथक परिश्रमानंतर या विद्यार्थ्यांनी आटोक्यात आणली. महाविद्यालयातील पर्यावरणपुरक होळीच्या कार्यक्रमासाठी बंगळूर येथून आलेल्या लेखिका शीतल देशमुख उपस्थित होत्या. त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या या मोहिमेचे साक्षीदार होत त्यांना प्रोत्साहन दिले. वणवा विझवल्यानंतर आयोजित वृक्षपूजन कार्यक्रमात त्या म्हणाल्या की, लाकडे जाळून होळी साजरी करण्यापेक्षा, जंगलाला लागलेली आग विझवून विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक शिक्षणाचेही सार्थक केले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दुर्गुणांची होळी करून सद्गुणांचे संवर्धन कसे करावे, याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे, असे देशमुख म्हणाल्या.
या मोहिमेचे नेतृत्व प्रा. घनश्याम दरणे यांनी केले. समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, प्रत्यक्ष संकटकाळात समाजाप्रती आणि निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडून यवतमाळ जिल्ह्यासमोर एक नवा वस्तूपाठ ठेवला आहे. वन विभागानेही या विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे कौतुक केले.
