यवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी एकदिवसीय भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री पुणेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद लुटण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी, विशेषतः महिला व बालकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी या उत्साही वातावरणावर एका अत्यंत थरारक व अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेने विरजण पडले.

महिलेचे केस बेरिंगमध्ये अडकले आणि…

यात्रेत फिरणाऱ्या एका मोठ्या आकाश पाळण्यात बसलेल्या बाली मारोती टाळीकोटे (२५, रा. फुलसावंगी) या तरुण महिलेच्या बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली. पाळणा वेगाने फिरत असताना अचानक बाली टाळीकोटे यांचे लांब केस मागे असलेल्या पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने आणि बेरिंगचा आस फिरत असल्याने क्षणार्धात त्यांचे केस मोठ्या ताकदीने ओढले गेले. यात त्यांच्या डोक्यावरील केसांसह संपूर्ण चामडी निघून आल्याची अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

नागरिकांच्या मदतीने अनर्थ टळला

महिला वेदनेने किंचाळल्याने आणि रक्ताच्या थारोळ्यात पाहून यात्रास्थळी एकच धावपळ आणि खळबळ उडाली. सुदैवाने, यात्रेच्या सुरक्षेसाठी तेथे तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि पोलीस जमादार सुहास कायटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ धाव घेतली. त्यांनी वेगाने फिरणारा पाळणा तातडीने थांबवला आणि अत्यंत कौशल्याने जखमी महिलेला बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

उपचार सुरू मात्र प्रकृती गंभीर

पोलीस प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता १०८ रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेवर प्राथमिक उपचार केले व पुढील आपत्कालीन उपचारासाठी त्यांना तातडीने पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र डोक्याची संपूर्ण चामडी सोलल्याने प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर व कारवाईची मागणी

या थरारक घटनेनंतर ग्रामीण भागातील यात्रांमध्ये उभारल्या जाणाऱ्या आकाश पाळण्यांच्या आणि पाळणाचालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आकाश पाळण्यांचे फिरते भाग किंवा बेरिंग उघडे ठेवल्यामुळेच हा गंभीर अपघात घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत आहे. अशा यात्रांमध्ये पाळण्यांची नियमित तांत्रिक पाहणी केली जाते का, प्रशासनाकडून सुरक्षेचे प्रमाणपत्र घेतले जाते का, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी निष्काळजी पाळणाचालकावर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी यात्रांमध्ये कडक सुरक्षा नियम लागू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.