यवतमाळ : पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर आणि पैनगंगा अभयारण्यात बुद्ध पोर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली. या अभयारण्यांत विविध प्रजातींचे तब्बल एक हजार ६५१ वन्यप्राणी आढळून आले. यात वाघ, चितळ, लांडगे, कोल्हे, सांबर, रानमांजर, रानकुत्रे असे विविध वन्यप्राणी आढळले. जवळपास १५० वन्यजीव प्रेमी व कर्मचाऱ्यांनी ही प्रगणना केली.

बुद्ध पोर्णिमेच्या रात्री वनविभागातर्फे वन्यजीवप्रेमींना निसर्ग अनुभवाची संधी दिली जाते. यात रात्री पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची मचाणीवर राहून मोजणी करण्यात येते. पांढकरवडा वन्यजीव विभागांतर्गत सोनदाभी, बिटरगाव, कोष्टा, खरबी, पारवा आणि पाटणबोरी असे सहा वनपरिक्षेत्र आहेत. या सहाही वनपरिक्षेत्रात सुन्ना, माथणी, खरबी, बिटरगाव, सोनदाभी व कोर्टा या सहा पर्यटन प्रवेशद्वारांवर बोर्डिंग पॉईंट तयार करण्यात आले होते. ४५ वन्यजीव प्रेमींसह ९९ वनरक्षक, वनपाल कर्मचारी अशा १४४ जण प्रगणनेत सहभागी झाले. ४७ मचाणींद्वारे ही प्रगणना करण्यात आली. त्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.

ट्रॅप कॅमेरे व प्राण्यांच्या पायांचे ठसे यांच्या निरीक्षणातून ही गणना करण्यात आली. या गणनेत सहा वाघ, ३२० वानर, २२१ मोर, ३५५ चितळ, १८ अस्वल, तीन घुबड, २११ नीलगाय, ४३० रानडुक्कर, १३ कोल्हे, १६ रानकुत्रे, तीन लांडगे, सात ससे, उदमांजर व खवल्यामांजर प्रत्येकी एक, सात रानमांजर, सात बिबट, सात सायाळ, १५ सांबर, चार हरिण, सहा इंडियन पिट्टा असे एकूण एक हजार ६५१ वन्यप्राणी आढळले. सर्वाधिक ८९८ वन्यप्राणी पाटणबोरी वनपरिक्षेत्रात आढळले. त्या खालोखाल पारवा २८१, कोरटा १६९, बिटरगाव १४९, सोनदाभी ९३, तर सर्वात कमी ६१ वन्यप्राणी खरबी वनपरिक्षेत्रात आढळले, अशी माहिती पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिपेश्वरमध्ये वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास

टिपेश्वर अभयारण्यात सध्या २० ते २२ वाघ असल्याचे सांगण्यात येते. शिवाय, इतरही समृद्ध वन्यजीव या जंगलात आहेत. हे अभयारण्य आकाराने लहान असले तरी येथे वन्यप्राण्यांना सुरक्षित अधिवास मिळत असल्याने येथील वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. सोबतच विविध प्रजातीच्या पक्षांनीही अभयारण्याच्या वैभवात भर घातली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील पांढरकवडा येथून २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून घाटंजीमार्गे ६० किमी तर तेलंगणातील अदिलाबादपासून ४२ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे. पांढरकवडा येथून पर्यटकांना सुन्ना गेटमधून तर घाटंजी मार्गे गेल्यास माथनी प्रवेशदारातून टिपेश्वरमध्ये सफारीसाठी जाता येते. परिसरात अलिकडे विविध रिसॉर्ट आणि होम स्टेची सुविधा झाल्याने महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यातील पर्यटकांचा ओढा येथे वाढला आहे