यवतमाळ: सध्या पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल दरम्यान उसळलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. या संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसला असून, दुबईसह तब्बल १२ देशांमधील हवाई वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेले यवतमाळ जिल्ह्यातील १० नागरिक दुबईमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. विमान फेऱ्या रद्द झाल्याने या पर्यटकांचा मायदेशी परतण्याचा प्रवास सध्या अनिश्चित बनला आहे.
यवतमाळ येथील राजीव निलावार, राजू लोहाना, सतीश बनगिनवार, निखील जिरापूरे आणि दिग्रस येथील श्याम पाटील हे पाच मित्र पर्यटनासाठी २४ फेब्रुवारी रोजी दुबईला रवाना झाले होते. ठरलेल्या नियोजनानुसार त्यांचा दुबई दौरा आनंदात पार पडला. मात्र, परतीच्या प्रवासाची वेळ आली असतानाच इराण आणि इस्रायलमधील तणाव टोकाला पोहोचला. अमेरिकेने इराणला दिलेल्या इशाऱ्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली. यामुळे दुबईहून भारताकडे येणारी विमाने रद्द करण्यात आली, आणि हे पाचही जण तिथेच अडकले.
दुबईत अडकल्याची बातमी यवतमाळात पोहोचताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या पर्यटकांनी प्रसंगावधान राखून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ‘आम्ही सर्वजण दुबईत सुखरूप आहोत, आमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची कोणतीही अडचण नाही. केवळ विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही,’ असा संदेश त्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे. विमान सेवा पूर्ववत होताच आम्हाला परतीचे तिकीट मिळेल, त्याची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले रवी जाधव यांची कन्या जागृती जाधव दुबईत अडकली आहे. ती दुबई येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. जागृती जाधव १ मार्च रोजी भारतात येणार होती. मात्र वेळेवर उड्डाण रद्द झाल्याने ती दुबईत अडकली असून सध्या ती सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यासोबतच पांडुरंग गुल्हाने, अल्का गुल्हाने, किशोर बागवले, आशा बागवले हे चार पर्यटक २६ फेब्रुवारीला दुबईला गेले होते. ४ मार्च रोजी त्यांचे परतीचे तिकीट आहे. मात्र विमान उड्डाण रद्द झाल्याने हे चारही पर्यटक दुबईत अडकले आहेत.
युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमधील वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. जोपर्यंत हवाई मार्ग सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे स्थगित ठेवली आहेत. यामुळे यवतमाळच्या या पर्यटकांना आणखी काही दिवस दुबईतच मुक्काम करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला त्यांना सुरक्षित परत आणण्याची विनंती केली आहे.
