यवतमाळ : सोन्याचे देवशिक्के असल्याचे भासवून ते तारण ठेवायचे आणि त्याबदल्यात लाखो रुपये घेऊन पसार व्हायचे, असा प्रकार उमरखेड शहरातील सोनार लाईन परिसरात उघडकीस आला आहे. बनावट असल्याचे नंतर स्पष्ट झालेल्या ११ देवशिक्क्यांच्या बदल्यात एका सोनाराला तब्बल १३ लाख रुपये गमवावे लागल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवा नावाच्या व्यक्तीसह एक महिला आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्के दिले; पैसे घेऊन गेले
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, कैलास नर उदावंत (५५, रा. टिळक वार्ड, उमरखेड) हे आपल्या के.एन. ज्वेलर्स या दुकानात असताना शिवा नावाची व्यक्ती दोन साथीदारांसह तेथे आली. या तिघांनी आपल्याकडे सोन्याचे देवशिक्के असून पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उदावंत यांनी १३ तोळे वजनाचे ११ देवशिक्के तारण म्हणून स्वीकारले आणि त्याबदल्यात १३ लाख रुपये रोख दिले. मात्र, काही वेळातच तारण ठेवलेल्या देवशिक्क्यांच्या अस्सलतेबाबत त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतून देवशिक्के परत आणून मशीनवर तपासले. या तपासणीत देवशिक्के सोन्याचे नसून बनावट असल्याचे उघड झाले. आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच उदावंत यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून देण्यात आलेला मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळले.
दागिणे तपासून घेणेच महत्वाचे
तिघांनी संगनमताने बनावट देवशिक्के खरे असल्याचे भासवून आपली फसवणूक केल्याचा आरोप उदावंत यांनी तक्रारीत केला आहे. फसवणूक झालेली १३ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यासह संबंधितांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे सोन्याचे दागिने किंवा वस्तू तारण स्वीकारताना त्यांची अस्सलता तांत्रिक पद्धतीने तपासणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.
