यवतमाळ : एखाद्या चित्रपटात शोभावं असं नाट्य उमरखेड तालुक्यातील भवानी गावात घडलं. पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी सज्ज झालेल्या वनविभागाच्या पथकाचा निशाणा असा काही चुकला की, माकड हुलकावणी देऊन पसार झालं आणि बिचारा एक निष्पाप व्यक्ती विनाकारण तात्पुरत्या बेशुद्धीच्या गर्तेत गेला. सदानंद खराटे (४५, रा. डोंगरगाव) असं या ‘दुर्दैवी’ नशिबाच्या धनी ठरलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

नेमके काय घडले?

गेल्या अनेक दिवसांपासून भवानी गावात एका माकडाने अक्षरशः उच्छाद मांडला होता. त्याच्या माकड चाळ्यांनी ग्रामस्थ हैराण झाले. अखेर वन विभागाकडे या माकडाची तक्रार करण्यात आली. त्यानंतर वन विभागाने रेस्क्यू टीमला गावात माकडास जेरबंद करण्यासाठी पाठवले.  मंगळवारी सायंकाळी जेव्हा शूटरने आपली ‘ट्रॅन्क्विलायझर गन’ माकडावर रोखली, तेव्हा सर्वांच्या नजरा माकडावर खिळल्या होत्या. आता त्याच्या माकडचाळ्यातून गावाची सुटका होईल, म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र, शूटरने नेम धरला माकडावर आणि इंजेक्शनचा ‘प्रसाद’ मिळाला सदानंद खराटे या व्यक्तीला! माकडाने शेवटच्या क्षणी दिलेल्या हुलकावणीमुळे सोडलेला ‘डार्ट’ थेट सदानंद यांच्या अंगात घुसला. त्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जमलेल्या गर्दीच्या कल्लोळात माकड मात्र उड्या मारत पळून गेले.

प्रकरणाची तांत्रिक बाजू

वन्यजीव कायद्यानुसार, हिंसक प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी झायलाझिन आणि केटामाइन यांसारख्या औषधांचे मिश्रण वापरले जाते. प्राण्याच्या वजनानुसार या औषधाची मात्रा ठरवलेली असते. जेव्हा हे इंजेक्शन मानवाला लागते, तेव्हा रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेवर त्याचा त्वरित परिणाम होतो. यामुळे रक्तदाब कमी होऊन व्यक्ती गाढ निद्रेत किंवा बेशुद्धावस्थेत जाते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या घटनेनंतर, सदानंद खराटे यांना तातडीने कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आल्याने अनर्थ टळला. त्यांची प्रकृती आता स्थीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

गोंधळ, संताप आणि मिश्किल चर्चा

या घटनेनंतर गावात चांगलाच गोंधळ उडाला. सदानंद यांच्या नातेवाईकांनी आणि संतप्त ग्रामस्थांनी, निशाणा माकडावर होता की माणसावर? असा सवाल करत वनविभागाला धारेवर धरले. तर दुसरीकडे, परिसरात माकडाच्या नशिबाची आणि सदानंद यांच्या दुर्दैवाची चर्चा सुरू होती. रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी गर्दी पांगवणे हे वनविभागाचे पहिले कर्तव्य असते, मात्र नियमावलीची पायमल्ली झाल्याचा आरोप आता गर्दी करणाऱ्या नागरिकांमधूनच होत आहे.

‘शार्प शूटर’च्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह

सदानंद खराटे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने वनविभागाच्या ‘शार्प शूटर’च्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माकड अजूनही मोकाटच असून, आता पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन करताना वनविभागाने आधी ‘माणसांना’ बाजूला सारून माकडावर निशाणा साधावा, असा उपरोधिक सल्ला नागरिक देत आहेत.